Sri Lanka Crisis: मोठी बातमी! श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनाला आंदोलकांनी घेरलं; गोटबाया राजपक्षे पळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 01:53 PM2022-07-09T13:53:02+5:302022-07-09T13:53:27+5:30
Sri Lanka Crisis: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेतील परिस्थिती आता दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे.
Sri Lanka Crisis: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेतील परिस्थिती आता दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. ताज्या माहितीनुसार आर्थिक परिस्थितीनं त्रासलेल्या जमावानं शनिवारी राष्ट्रपती गोयबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. समोर आलेल्या माहितीनुसार यानंतर गोटबाया राजपक्षे यांनी निवासस्थान सोडून पळ काढला आहे. संरक्षण विभागातील सुत्रांच्या माहितीनुसार राजपक्षे आता राष्ट्रपती भवनात नाहीत. त्यांनी आंदोलक अधिक हिंसक होत असल्यामुळे पळ काढला आङे.
कोलंबो स्थित राष्ट्रपती भवनाला आंदोलकांनी घेरलं आहे. यानंतर आंदोलकांनी गोटबाया यांच्या निवासस्थानातील सामानाचीही तोडफोड केल्याची माहिती समोर आली. श्रीलंकेतील वाढत्या आर्थिक संकटामळे जनतेनं राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सरकार विरोधात देशभरात हिंसक निदर्शनं होतं आहे. सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात रॅली काढल्या जात आहेत.
शुक्रवारी श्रीलंकेत अनिश्चित कालावधीसाठी कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. तसंच सैन्याला देखील हायअलर्ट मोडवर ठेवण्यात आलं आहे. पोलीस प्रमुख चंदना विक्रमरत्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानी आणि आसपासच्या शहरांमध्ये शुक्रवारी नऊ वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हजारो आंदोलकांनी सरकार विरोधी निदर्शनं करत राष्ट्रपती भवनातील सत्ता उलथवून टाकण्यासाठी भवनात प्रवेश केला होता. त्यामुळे कर्फ्यूची घोषणा करण्यात आल्याचं पोलीस अधिकारी म्हणाले.
पोलिसांनी कर्फ्यू लागू करण्याआधी कोलंबोमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसंच पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर करण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार मोर्चात धार्मिक नेते, राजकीय पक्ष, शिक्षक, शेतकरी, चिकित्सक, मच्छीमार आणि सामाजिक कार्यकर्ते देखील सामील झाले होते.
खासदारानं केली आत्महत्या
श्रीलंकेत एका खासदाराच्या वाहनाला चहुबाजूने प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी घेरलं होते. त्यावेळी खासदारांच्या गाडीत फायरिंग झाली. तेव्हा लोक भडकले. त्यानंतर खासदार गाडीतून पळून एका इमारतीत लपले. तिथेही लोकांनी त्यांना घेरलं. जमाव पाठलाग करत असल्याचं पाहून खासदार भयभीत झाले. त्यांनी स्वत:च्या पिस्तुलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. इमारतीत त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळला. या घटनेत २७ वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला. खासदाराच्या गाडीतून झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.