विक्रमसिंघेंकडे श्रीलंकेची धुरा; २०२०च्या निवडणुकीत शून्य खासदार, आता थेट झाले पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 08:45 PM2022-05-12T20:45:50+5:302022-05-12T20:51:42+5:30
सार्वत्रिक निवडणुकीत सगळे उमेदवार पराभूत; संसदेत पक्षाचा एकही खासदार नसताना विक्रमसिंघे पंतप्रधान झाले
कोलंबो: कर्जाच्या ओझ्यामुळे पूर्णपणे वाकलेल्या, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेचं नेतृत्त्व आता रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे असेल. विक्रमसिंघे देशाचे पंतप्रधान असतील अशी घोषणा झालेली आहे. श्रीलंकेत सध्या प्रचंड महागाई आहे. कर्जाच्या ओझ्यामुळे अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. लोक रस्त्यावर उतरले आहेत. जाळपोळ सुरू आहेत. अशा परिस्थितीत विक्रमसिंघेंकडे देशाचं नेतृत्त्व आलं आहे.
रानिल विक्रमसिंघे देशातील सर्वात जुन्या पक्ष असलेल्या युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते आहेत. चारवेळा त्यांनी श्रीलंकेचं पंतप्रधानपद भूषवलं आहे. मात्र २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत यूएनपीला एकही जागा जिंकता आली नाही. यूएनपीचा मजबूत बालेकिल्ला असलेल्या कोलंबो मतदारसंघातून विक्रमसिंघे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. कम्युलेटिव्ह नॅशनल व्होटच्या आधारे यूएनपीला एक जागा देण्यात आली. त्या माध्यमातून विक्रमसिंघे संसदेत पोहोचले.
आतापर्यंत चारवेळी श्रीलंकेचे पंतप्रधान राहिलेल्या विक्रमसिंघे यांना ऑक्टोबर २०१८ मध्ये राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधानपदावरून हटवलं. मात्र दोनच महिन्यांत त्यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची सुत्रं हाती घेतली. आता त्यांना सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना आणि विरोधी पक्ष असलेल्या समगी जन बालावेगायामधील एका गटासह अन्य अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.
दूरदृष्टी असलेले नेते अशी विक्रमसिंघे यांची ओळख आहे. अर्थव्यवस्था सांभाळणारी धोरणं आखण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. आंतरराष्ट्रीय सहयोग मिळवण्यात ते निष्णात आहेत. श्रीलंकेला संकटातून बाहेर काढण्याची अवघड जबाबदारी आता विक्रमसिंघे यांना पेलावी लागेल.