Sri Lanka Crisis: श्रीलंकेत आणीबाणी लागू असताना मध्यरात्री संपूर्ण कॅबिनेटचा राजीनामा; आता पुढे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:37 AM2022-04-04T07:37:47+5:302022-04-04T10:24:44+5:30
Sri Lanka Crisis: श्रीलंकन सरकारमधील २६ मंत्र्यांचा राजीनामा; देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
कोलंबो: आर्थिक घडी विस्कटल्यानं कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या श्रीलंकेची स्थिती दिवसागणिक बिकट होत चालली आहे. देशात आणीबाणी लागू आहे. दरम्यान श्रीलंका सरकारच्या पूर्ण कॅबिनेटनं राजीनामा दिला आहे. देशाचे शिक्षण मंत्री आणि सभागृह नेते दिनेश गुणवर्धने यांनी कॅबिनेटच्या राजीनाम्याची माहिती दिली.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांच्या व्यक्तिरिक्त सर्व २६ मंत्र्यांनी त्यांचे राजीनामे पंतप्रधानांकडे सुपूर्द केले. या सामूहिक राजीनाम्याचं कोणतंही कारण दिनेश गुणवर्धने यांनी सांगितलं नाही. सध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेत महागाई वाढली आहे. त्यामुळे देशाचा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या स्थितीत आहे.
श्रीलंकेतील जनता अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून लोकांना इंधनासाठी, घरगुती गॅससाठी रांगेत उभं राहावं लागत आहे. जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. राष्ट्रपती गोटाबायो राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा विशेषाधिकारांचा वापर करत देशात १ एप्रिलपासून आणीबाणी लावली. याशिवाय सोशल मीडियावरही निर्बंध लागू करण्यात आले.
पंतप्रधान राजपक्षे यांचे पुत्र आणि देशाचे क्रीडा मंत्री असलेल्या नमल राजपक्षे यांनी सर्वप्रथम राजीनामा दिला. त्यानंतर तासाभरात अन्य मंत्र्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा पंतप्रधानांकडे सुपूर्द केला. कॅबिनेट मंत्र्यांचे राजीनामे सध्या तरी पंतप्रधान कार्यालयाकडे आहेत. लवकरच ते राष्ट्रपतींकडे पाठवले जातील.