Sri Lanka crisis: श्रीलंकेसोबत धोका! राजपक्षेंची सून कुटुंबाला घेऊन पहाटेच देश सोडून पळाली; प्रचंड गुप्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 02:29 PM2022-04-04T14:29:15+5:302022-04-04T14:49:48+5:30
Sri Lanka crisis: श्रीलंकेत अनेक दिवसांपासून अशा अफवा पसरत होत्या. नमल हे श्रीलंकेचे युवा आणि क्रीडा मंत्री होते. रात्रीच त्यांच्यासह मंत्रिमंडळाने राजीनामे दिले होते.
श्रीलंकेमध्ये मोठी राजकीय आणि आर्थिक उलथापालथ झाली आहे. मध्यरात्रीच राजपाक्षेंनी मंत्र्यांना राजीनामे द्यायला लावत लोकांमधील राग शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असताना राजपाक्षेंच्या सुना, मुलांसह देश सोडून पळाल्याचे वृत्त आले आहे. यामुळे आधीच महागाईच्या आगडोंबात होरपळत असलेली जनता आणखी संतापली आहे.
श्रीलंकेच्या या अवस्थेला राजपाक्षे कुटुंबीयच जबाबदार आहे, असा जनतेचा आरोप आहे. राजपाक्षेंच्या कुटुंबातील ७ जण सत्ता उपभोगत होते. राष्ट्रपती, पंतप्रधान ते अर्थ मंत्री आदी सर्व मलईची पदे त्यांच्याकडेच होती. चुकीचे निर्णय घेतल्याने आणि वारेमाप पैसा खर्च केल्याने आज देशाची ही गंभीर अवस्था झाली असल्याचा आरोप करत आहेत.
श्रीलंकेत आता वैतागलेली जनता उग्र, हिंसक आंदोलने करू लागली आहे. तांदूळ, ब्रेड, गहू, भाजीपाल्यासारख्या वस्तू एवढ्या महाग आणि तुटवडा आहे की श्रीमंतही पैसे असून खरेदी करू शकत नाहीय. घरात वीज नाही, पेट्रोल पंपांवर इंधन नाही, अशी भीषण अवस्था आली आहे. श्रीमंतांनाही अर्धपोटी रहावे लागत आहे. सरकारमध्ये नवीन चेहरे आणण्याची खेळी राजपाक्षे यांनी खेळली असली तरी पंतप्रधान महिंदा राजपक्षेंच्या कुटुंबाने देश सोडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
तेथील प्रमुख वृत्तपत्र डेली मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. महिंदा राजपक्षे सरकारमध्ये मंत्री असलेला त्यांचा मुलगानमल राजपक्षे याची पत्नी लमिनी राजपक्षेने श्रीलंका सोडली आहे. याचसोबत राजपक्षे परिवारातील नऊ जणांनी श्रीलंकेतून गुप्त ठिकाणी पलायन केल्याचे म्हटले आहे. हे लोक कोणत्या देशात गेले आहे, याची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. सुत्रांनुसार रविवारी, ३ एप्रिलच्या सकाळी सकाळीच या लोकांनी श्रीलंका सोडल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या इतर दोन सुनाही देश सोडून गेल्या आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. श्रीलंकेत अनेक दिवसांपासून अशा अफवा पसरत होत्या. नमल हे श्रीलंकेचे युवा आणि क्रीडा मंत्री होते. रात्रीच त्यांच्यासह मंत्रिमंडळाने राजीनामे दिले होते.