Sri Lanka Economic Crisis : महागाईचा आगडोंब! श्रीलंकेत जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले, 1 किलो सफरचंद 1600 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 10:23 AM2022-07-18T10:23:12+5:302022-07-18T10:31:06+5:30
Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत फळे आणि भाज्यांचे भाव इतके वाढले आहेत की सामान्य माणसाला ते विकत घेणं जवळपास अशक्य झाले आहे.
श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय संकटाचा थेट फटका हा आता सर्वसामान्य जनतेला बसत आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून लोक उपासमारीला बळी पडत आहेत. श्रीलंकेत फळे आणि भाज्यांचे भाव इतके वाढले आहेत की सामान्य माणसाला ते विकत घेणं जवळपास अशक्य झाले आहे. देशात एक किलो सफरचंदांच्या किमती 1600 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत, तर इतर फळांच्या किमतीही खूप वाढल्या आहेत. श्रीलंकेतील सर्व खाद्यपदार्थांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. याशिवाय देशात अशा अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे.
पैशाच्या टंचाईमुळे देशात वस्तू संपत चालल्या आहेत आणि जे काही शिल्लक आहे ते विकत घेणे प्रत्येकाच्या हातात नाही. एक किलो सफरचंदाचा भाव 1500 ते 1600 रुपयांवर गेला आहे, जो जानेवारीत 350 रुपये किलो होता. एखाद्याला श्रीलंकेत पेरू विकत घ्यायचा असेल तर त्याला एक किलोसाठी 600 रुपये मोजावे लागतील. जानेवारीत ते 300 रुपये होते. जर तुम्हाला संत्री घ्यायची असतील तर श्रीलंकेत त्याची किंमत 1500 रुपये आहे. जानेवारीत येथे एक किलो संत्र्याचा भाव 350 रुपये होता.
श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर नारळाच्या किमती 150 रुपयांवर पोहोचल्या आहेत. जानेवारी महिन्यात ही किंमत 70 रुपये होती. स्ट्रॉबेरीचा भाव आता श्रीलंकेत 775 रुपयांवर पोहोचला आहे. जानेवारी महिन्यात येथील स्ट्रॉबेरीचा दर 500 रुपये किलो होता. मात्र आता दरात सातत्याने वाढ होत आहे. श्रीलंकेतील अनेक वस्तूंचा साठाही जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. हाच माल परदेशातून आयात करून श्रीलंकेत पोहोचतो.
श्रीलंकेकडे परकीय चलनाचा साठा कमी असल्याने तो माल आयात होत नाही आणि त्याचा परिणाम आता बाजारावर दिसून येत आहे. खाद्यपदार्थांबद्दल बोलायचे झाले तर पास्ताचा साठा संपला आहे. त्याच वेळी, कॉर्नफ्लेक्स 500 रुपये, केचअप 450 रुपये 300 ग्रॅम, न्यूट्रेला 4500 रुपये प्रति किलो, काजू 6 हजार रुपये प्रति किलो, लोणी 1300 रुपये प्रति 100 ग्रॅम, चीज 1500 रुपये प्रति 100 ग्रॅम आहे. त्याचप्रमाणे इतर वस्तूंच्या किमतीही अनेक पटींनी वाढल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.