Sri Lanka Crisis : संकटात श्रीलंका, भारताच्या मदतीनं बदलतंय जीवन; आतापर्यंत 'इतक्या' कोटींची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 05:15 PM2022-03-28T17:15:24+5:302022-03-28T17:17:06+5:30
Sri Lanka Crisis : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी आता भारत धावून गेला आहे. कोट्यवधींच्या केलेल्या मदतीमुळे आता लोकांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळत आहे.
भारताचा शेजारी देश श्रीलंका (Sri Lanka Crisis) सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तसंच श्रीलंकेवर दिवाळखोरीचा मोठ्या प्रमाणावर धोकाही आहे. चलनाचे मूल्य घसरल्याने अनेक महत्त्वाच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. लोक डिझेल-पेट्रोल (Diesel-Petrol), गॅस (Gas) खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावताना दिसत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सरकारला पेट्रोल पंपांवर सैन्याची तैनाती करावी लागले आहे. अशा भीषण परिस्थितीत श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारत पुढे आला आहे. भारताच्या मदतीने श्रीलंकेतील लोकांना दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी मदत मिळतेय.
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. भारताने श्रीलंकेला जी ५०० मिलिन डॉलर्सची लाईन ऑफ क्रेडिटची (LoC) मदत केली आहे. त्यामुळे लोकांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत मिळत आहे, असं त्यांनी नमूद केलंय. आपण सेंट्र कोलंबोच्या सेट्रल परिसरातील (Downtown Colombo) इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर पोहोचलो. एमडी मनोज गुप्ता यांनी इंधनाच्या पुरवठ्याच्या स्थितीबाबत माहिती दिली, असंही जयशंकर म्हणाले. ते मालदीवच्या दौऱ्यानंतर आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत.
Visited Lanka IOC in downtown Colombo. MD Manoj Gupta briefed me on fuel supply situation.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 28, 2022
Indian LoC of US$ 500 million is helping Sri Lankan people in their everyday life. pic.twitter.com/1EmTpXmzSp
पेट्रोल पंपावर लष्कर
इंधन खरेदीसाठी रांगेत उभे असलेल्या काही लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त गेल्या आठवड्यात समोर आलं होतं. सध्या श्रीलंकेत पेट्रोल डिझेलचे दर वाढण्यासोबतच योग्य पुरवठाही होत नसल्यानं पेट्रोल पंपांवर मोठा रांगा पाहायला मिळत आहेत. हजारो लोक तासनतास रांगेत उभं राहून इंधन खरेदी करत आहेत. "अनेक तासांपर्यंत रांगेत उभं रागिल्यानंतर तीन ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूच्या झालेल्या घटनेपश्चात पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती श्रीलंकन लष्कराचे प्रवक्ते निलांखा प्रेमारत्ने यांनी दिली.
सध्या श्रीलंकेतील परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की अन्नधान्यासह अनेक आवश्यक वस्तूंची कमतरता भासत आहे. इतकंच नाही तर सरकारसमोर आर्थिक आणीबाणी लावण्याची परिस्थिती उद्भ्वताना दिसतेय. श्रीलंकेचं परकीय चलनही संपण्याच्या मार्गावर आणि चलनाचं मूल्यही विक्रमी घसरलंय. याशिवाय देशात तांदूळ आणि साखरेचीही कमतरता निर्माण झाली आहे. त्यातच साठेबाजांचाही प्रश्न उपस्थित होत आहे.