जागतिक बँकेकडून श्रीलंकेला 16 कोटी डॉलर्सची मदत; पंतप्रधान हे पैसे इंधन खरेदीसाठी वापरतील का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 04:43 PM2022-05-18T16:43:08+5:302022-05-18T16:45:34+5:30
Economic Crisis: जागतिक बँकेकडून 16 कोटी डॉलर मिळाले आहेत. आशियाई विकास बँकेकडून (ADB) अनुदान मिळण्याची शक्यता आहे, असे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितले.
कोलंबो : श्रीलंकेत गंभीर आर्थिक संकट असताना निदर्शने तीव्र झाली आहेत. येथील परिस्थिती हळूहळू बिकट होत आहे. दरम्यान, देशाला जागतिक बँकेकडून 16 कोटी डॉलर्सची मदत मिळाली आहे. आर्थिक संकटामुळे देशात इंधन आणि गॅसचा तुटवडा आणि त्याविरोधात सुरू असलेले आंदोलन पाहता या आर्थिक मदतीचा काही भाग इंधन खरेदीसाठी वापरण्यासाठी चौकशी केली जात आहे, असे श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी बुधवारी संसदेत सांगितले.
जागतिक बँकेकडून 16 कोटी डॉलर मिळाले आहेत. आशियाई विकास बँकेकडून (ADB) अनुदान मिळण्याची शक्यता आहे, असे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितले. तसेच, जागतिक बँकेकडून मिळालेल्या पैशांचा वापर इंधन खरेदीसाठी केला जाऊ शकत नाही. मात्र आम्ही त्यातील काही हिस्सा इंधन खरेदीसाठी वापरता येईल का, यासंबंधी चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे म्हणाले.
मंगळवारी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी एकच दिवस पुरेल इतका इंधनसाठा शिल्लक असल्याची माहिती दिली होती. रानिल विक्रमसिंघे यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात "देशात केवळ एक दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा शिल्लक आहे. तेलाच्या तीन शिपमेंट आयात करण्यासाठी लागणारे डॉलर्सही सरकार जमा करू शकत नाही. तेलाची जहाजं पेमेंटसाठी कोलंबो बंदराबाहेर वाट पाहत आहेत" असे म्हटले होते.
दरम्यान, देशभरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपावर नो पेट्रोलचे बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही तासांत देशातील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. पेट्रोल मिळेल या आशेने नागरिकांनी अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या आहेत. यासोबतच महागाईसह देशात अन्नधान्य़ाचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.