श्रीलंकेने काढले २०० जणांना देशाबाहेर, अनेक भागांत अटकसत्र सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 06:16 AM2019-05-06T06:16:32+5:302019-05-06T06:16:47+5:30
१५ दिवसांपूर्वी सुमारे ३०० निष्पापांचे बळी घेणारे ईस्टर सण्डेच्या वेळचे घातपाती बॉम्बस्फोट एका स्थानिक कट्टरपंथी इस्लामी संघटनेने घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्रीलंकेने देशात राहणाऱ्या सुमारे २०० विदेशी इस्लामी धर्मगुरूंना बाहेरचा रस्ता दाखविला आहे.
कोलंबो - १५ दिवसांपूर्वी सुमारे ३०० निष्पापांचे बळी घेणारे ईस्टर सण्डेच्या वेळचे घातपाती बॉम्बस्फोट एका स्थानिक कट्टरपंथी इस्लामी संघटनेने घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर श्रीलंकेने देशात राहणाऱ्या सुमारे २०० विदेशी इस्लामी धर्मगुरूंना बाहेरचा रस्ता दाखविला आहे.
श्रीलंकेचे गृहमंत्री वजिरा अभयवर्धने यांना सांगितले की, या आत्मघाती हल्ल्यांनंतर आम्ही व्हिसाचे नियम कडक करून त्यांची कठोर अंमलबजावणी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून कायदेशीरपणे देशात आलेल्या; परंतु व्हिसाची मुदत संपूनही वास्तव्य करीत असलेल्या ६०० हून अधिक विदेशी नागरिकांना तात्काळ देशाबाहेर काढण्यात आले आहे. यात विविध देशांतून आलेल्या सुमारे २०० इस्लामी धर्मगुरूंचाही समावेश आहे. गृहमंत्र्यांनी हे लोक कोणत्या देशांचे होते हे सांगितले नाही. मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार त्यात बांगलादेश, भारत, मालदीव आणि पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश आहे.
अभयवर्धने म्हणाले की, श्रीलंकेत सर्वच धर्माच्या धार्मिक संस्था त्यांच्या येथे धार्मिक प्रवचने देण्यासाठी गेली अनेक वर्षे परदेशी धर्मगुरूंना बोलावत असतात. त्यांनी यायला आमची काही हरकत नाही; पण हल्ली ते प्रमाण जरा जास्तच वाढल्याचे दिसत होते. ईस्टरच्या बॉम्बहल्ल्यांनंतर आम्ही अशा मंडळींच्या वास्तव्याकडे जरा अधिक बारकाईने लक्ष देत आहोत.
या हल्ल्यांनंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली असून, लष्कर व पोलिसांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. ते वापरून देशाच्या अनेक भागांत अजूनही धाड व अटकसत्र सुरू आहे.
अजूनही धोका पूर्ण टळला नसल्याने ख्रिश्चन बांधवांनी आपापल्या घरात बसूनच प्रार्थना केली. (वृत्तसंस्था)
शाळा पुन्हा सुरू होणार
खबरदारीचा उपाय म्हणून गेले दोन आठवडे बंद राहिलेल्या श्रीलंकेतील शाळा सोमवारपासून कडक बंदोबस्तात पुन्हा सुरू होणार आहेत. माध्यमिक शाळा ६ मेपासून, तर प्राथमिक शाळा १३ मेपासून सुरू होतील. प्रत्येक शाळेत विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.