श्रीलंका बुडाली पण भारताला धोका! चीन हेरगिरीसाठी कुप्रसिद्ध जहाज पाठविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 01:54 PM2022-07-24T13:54:15+5:302022-07-24T13:54:38+5:30
शोध मोहिमेच्या नावावर चीन हेरगिरी करतो. हे जहाज त्यासाठीच कुप्रसिद्ध आहे. चीनचे सर्व सॅटेलाईट नियंत्रित करण्याची यंत्रणा या जहाजावर आहे.
कोलंबो: चीनच्या कर्जाखाली दबलेल्या श्रीलंकेमध्ये हाहाकार उडालेला आहे. त्यातून सावरत नाही तोच चीनने एक मोठी चाल खेळली आहे. श्रीलंकेच्या बंदरावर ताबा मिळविला असून शक्तीशाली टेहळणी जहाज युआन वांग ५ पाठविण्याची तयारी सुरु केली आहे. हे जहाज एवढे खतरनाक आहे की, ते उपग्रहांनाही आपल्या नियंत्रणात ठेवू शकते.
श्रीलंकेचे हंबनटोटा बंदर चीनने विकसित केले आहे. मात्र, श्रीलंका त्याचे पैसे देऊ शकला नाही. यामुळे चीनने ते बंदर पुढील ९९ वर्षांसाठी ताब्यात घेतले आहे. आता हे जहाज ११ ऑगस्टपासून चीनच्या बंदरावर तैनात केले जाणार आहे. आठवडाभर हे जहाज तिथे असेल. याचा धोका भारताला आहे.
हे जहाज अरबी आणि हिंदी समुद्रात चिनी पानबुड्यांसाठी रस्ता शोधणार आहे, अशी भीती तज्ज्ञांना वाटत आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन महिने हे जहाज आसपासच्या परिसरात शोध मोहिम राबविण्याची शक्यता आहे. हंबनटोटा बंदर श्रीलंकेसाठी पांढरा हत्ती ठरला आहे. आता हे बंदर ताब्यात घेताना चीनने आसपासची हजारो एकर जमीनही मागितली आहे. गेल्या काही काळात हिंदी महासागरात चिनी जहाजे आणि पानबुड्यांची ये जा वाढली आहे.
दुसरीकडे चीन समुद्री चाच्यांशी लढण्यासाठी युद्धनौकांची गस्त वाढवत असल्याचा दावा करत आहे. परंतू त्यामागे त्यांचा उद्देश हिंदी महासागरावर ताबा मिळविणे हा आहे. भारताला वेढण्यासाठी चीनने श्रीलंका आणि पाकिस्तानात बंदरे उभारली आहेत. याचबरोबर हिंदी महासागरातील गॅस, कच्चे तेल आदी साठ्यांवर चीनची नजर आहे. याचबरोबर चीनला मोठ्या प्रमाणावर मच्छीची गरज आहे. यामुळे अशाप्रकारची शोधमोहिम चीनने आखल्याचे सांगितले जात आहे.
शोध मोहिमेच्या नावावर चीन हेरगिरी करतो. हे जहाज त्यासाठीच कुप्रसिद्ध आहे. चीनचे सर्व सॅटेलाईट नियंत्रित करण्याची यंत्रणा या जहाजावर आहे. या जहाजाच्या मदतीने चीनने त्यांचे अंतराळ स्थानक शेनझोऊ, चंद्र, मंगळावर पाठविलेले यान आणि बाईदू सॅटेलाईट लाँचिंगचे नियंत्रण आणि निरीक्षण केले होते.