Sri Lanka Crisis : “राष्ट्राध्यक्ष कोणीही बनो..,” श्रीलंकेतील नेत्याचं पंतप्रधान मोदींकडे भावूक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 09:25 AM2022-07-20T09:25:59+5:302022-07-20T09:26:31+5:30
श्रीलंकेच्या संसदेत ४४ वर्षात पहिल्यांदाच आज (२० जुलै) थेट राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे.
श्रीलंकेतील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक आवाहन केले आहे. “श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणीही येवो, माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील सर्व राजकीय पक्षांना आणि तेथील लोकांना एक नम्र विनंती आहे की या संकटातून बाहेर येण्यासाठी मा लंका आणि तेथील लोकांची मदत करत राहा,” असं प्रेमदासा म्हणाले. त्यांनी ट्वीट करत भारताला हे आवाहन केलं आहे.
श्रीलंकेच्या संसदेत ४४ वर्षात पहिल्यांदाच आज (२० जुलै) थेट राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. हंगामी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्याशिवाय दुल्लास अल्हप्परुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. देश सोडून पळून गेलेल्या गोटाबाया राजपक्षे यांच्या जागी या तिघांपैकी एकाची निवड केली जाईल.
Irrespective of who becomes the President of Sri Lanka tomorrow it is my humble and earnest request to Hon. PM Shri @narendramodi, to all the political parties of India and to the people of India to keep helping mother Lanka and it’s people to come out of this disaster.
— Sajith Premadasa (@sajithpremadasa) July 19, 2022
निवडणुकीपूर्वी, दुल्लस अल्हप्पारुमा विक्रमसिंघे यांच्यावर आघाडी घेत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या पक्षातील बहुतांश नेत्यांशिवाय त्यांना विरोधकांचाही पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय श्रीलंकेचे माजी परराष्ट्र मंत्री जीएल पेरीस म्हणाले की, “श्रीलंकेच्या सत्ताधारी पक्ष पोदुजाना पेरामुनाच्या बहुतेक नेत्यांव्यतिरिक्त, विरोधी पक्षाचे नेतेदेखील दुल्लास अल्हप्पारुमा यांना राष्ट्रपती आणि सजिथ प्रेमदासा यांना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात.”
विक्रमसिंघे आघाडीवर?
मात्र, ७३ वर्षीय विक्रमसिंघे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत अजूनही आघाडीवर असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. परंतु २२५ जागांच्या संसदेत बहुमत सिद्ध करणे इतकं सोपं नसेल. श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती बिकट होण्यापूर्वी ऑगस्ट २०२० ची संसदीय संरचना पाहिली तर १४५ खासदार संख्या असलेल्या एसएलपीपी पक्षातून ५२ खासदार फुटले होते. यानंतर ९३ खासदार राहिले होते. त्यानंतर ४ जण परतले होते. विक्रमसिंघे यांना बहुमतासाठी ११३ खासदारांचं समर्थन आवश्यक आहे.