श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षेंचे सरकार अल्पमतात; ४१ सदस्यांचा पाठिंबा मागे, नव्या आराेग्यमंत्र्यांचा दुसऱ्याच दिवशी राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:19 AM2022-04-06T07:19:16+5:302022-04-06T07:19:53+5:30
Sri Lanka News: आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिघडली आहे. एकीकडे राष्ट्रपती गाेटबाया राजपक्षे यांची सत्तेवरील पकड कमकुवत हाेत असल्याचे दिसत आहे.
काेलंबाे - आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिघडली आहे. एकीकडे राष्ट्रपती गाेटबाया राजपक्षे यांची सत्तेवरील पकड कमकुवत हाेत असल्याचे दिसत आहे. संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर ४१ खासदारांनी सत्ताधारी आघाडीला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. त्यामुळे राजपक्षे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर नवे अर्थमंत्री अली साबरी यांनी तीन मंत्र्यांसह शपथ घेतली हाेती. मात्र, अली साबरी यांनी दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. ४१ खासदारांनी पाठिंबा मागे घेतल्यानंतर सत्ताधारी आघाडीकडे १०९ संख्याबळ आहे. बहुमताचा आकडा ११३ आहे. २०२०च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये २२५ पैकी १५० जागा जिंकल्या हाेत्या. त्यानंतर विराेधी पक्षाचेही काही सदस्य सत्ताधाऱ्यांच्या कंपूत दाखल झाले हाेते. अशा स्थितीतही सरकारने बहुमताचा दावा केला आहे. तर विराेधी पक्षाने गाेटबाया यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माजी राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांच्या नेतृत्वाखालील नाराज खासदारांकडून गाेटबाया यांना हटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिणामी सरकार अल्पमतात आल्याचे चित्र असून राजपक्षे यांची सत्तेवरील पकड कमकुवत झाल्याचे दिसत आहे.
अली साबरी यांनी दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला. नव्या अर्थमंत्र्याची नियुक्ती करण्यासाेबतच सध्याच्या संकटसमयी काही अपरंपरागत पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
आराेग्य आणीबाणी
देशात आता सार्वजनिक आराेग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. केवळ आपत्कालीन व गंभीर आजाराच्या रुग्णांनाच उपचारांसाठी प्राथमिकता देण्यात येणार आहे. आर्थिक संकट आणखी गडद झाल्यास औषधांचा साठादेखील संपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.