श्रीलंकेच्या बडतर्फ पंतप्रधानांना संसदेच्या अध्यक्षांकडून पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:17 AM2018-10-29T05:17:55+5:302018-10-29T05:18:15+5:30
राष्ट्राध्यक्षांनी बडतर्फ केलेले पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या पाठीशी श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या उभे राहिल्याने भारताच्या दक्षिणेकडील शेजारी देशात दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या घटनात्मक पेचप्रसंगात नवी भर पडली.
कोलंबो : राष्ट्राध्यक्षांनी बडतर्फ केलेले पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या पाठीशी श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या उभे राहिल्याने भारताच्या दक्षिणेकडील शेजारी देशात दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या घटनात्मक पेचप्रसंगात नवी भर पडली. संसदेच्या अध्यक्षांनी बडतर्फ पंतप्रधानांनाच पंतप्रधान म्हणून मान्यता दिली, एवढेच नव्हे तर संसद येत्या १६ नोव्हेंबरपर्यंत निलंबित ठेवण्याचा राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांचा निर्णयही चुकीचा असल्याचे म्हटले.
राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांनी शुक्रवारी पंतप्रधान विक्रमसिंघे यांना बडतर्फ करून त्यांच्या जागी माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना नेमले. आपल्याकडे अजूनही बहुमत असल्याने राजपक्षे यांची नेमणूक व शपथविधी घटनाबाह्य आहे, असा दावा विक्रमसिंघे यांनी केला.
श्रीलंकेत लोकशाही मूल्ये आणि संवैधानिक प्रक्रियांचा आदर केला जाईल, अशी अपेक्षा भारताने रविवारी व्यक्त केली. तेथे झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, श्रीलंकेतील घटनांवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. तेथे लोकशाही मूल्यांची बूज राखली जाईल, अशी एक शेजारी व लोकशाही देश म्हणून भारताची अपेक्षा आहे. श्रीलंकेतील विकासकामांना भारताकडून यापुढेही मदत देणे सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.