श्रीदेवींचे पार्थिव आज भारतात आणणार, दुबई पोलिसांनी अखेर दिली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 02:51 PM2018-02-27T14:51:12+5:302018-02-27T15:24:44+5:30
प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात नेण्यास दुबई पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. या संदर्भात दुबई पोलिसांनी भारतीय दुतावासाला पत्र पाठवले असून, पोलिसांच्या परवानगीनंतर श्रीदेवी यांचे पार्थिव आता...
दुबई - प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात नेण्यास दुबई पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. या संदर्भात दुबई पोलिसांनी भारतीय दुतावासाला पत्र पाठवले असून, पोलिसांच्या परवानगीनंतर श्रीदेवी यांचे पार्थिव आता आज भारतात आणले जाणार आहे, श्रीदेवींच्या कुटुंबीयांनाही भारतात परतण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दुबई पोलिसांच्या परवानगीवनंतर श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी श्रीदेवी यांचे पार्थिव लेपनासाठी नेण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी तासभराचा अवधी लागू शकतो. त्यानंतर इतर औपचारिकता पूर्ण करून श्रीदेवींचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल. प्रथमत: श्रीदेवींचे पार्थिव त्यांच्या दुबईमधील कुटुंबीयांच्या घरी नेण्यात येणार असून, नंतर पार्थिव विमानातून भारतात आणले जाईल, असे सांगण्यात येत आहे.
Dubai Police hands over letters for release of #Sridevi's mortal remains, to the Indian consulate and her family members, so that they can proceed for embalming. (Khaleej Times)
— ANI (@ANI) February 27, 2018
जुमैरा एमिरेट्स टॉवर या हॉटेलच्या रुम नंबर 2201 मध्ये शनिवारी रात्री श्रीदेवी बेशुद्धावस्थेत सापडल्या होत्या. श्रीदेवींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यू तोल गेल्याने बाथटबमध्ये पडून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मृत्यूचे गुढ वाढल्याने दुबई पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली होती.
दुबई पोलिसांनी श्रीदेवीचे पती बोनी कपूर आणि हॉटेल स्टाफची चौकशी केली होती. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत बोनी कपूर यांना दुबई सोडता येणार नसल्याचेही सांगितले होते. अखेर आज दुपारी बोनी कपूर यांना भारतात परतण्यास परवानगी देण्यात आली. श्रीदेवींचे पार्थिव जरी भारतात नेण्यास परवानगी देण्यात आली असली तरी या प्रकरणाची चौकशी सुरू राहणार असल्याचे दुबई पोलिसांनी म्हटले आहे.
दरम्यान, संशयाचे दाट धुके निर्माण झाल्यामुळे श्रीदेवी यांच्या मृतदेहाचे आणखी एकदा शवविच्छेदन होऊ शकते असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. त्यामुळे श्रीदेवींचा मृतदेह भारतात आणण्यास उशीर होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत होता.