Sri lanka Crisis : महागाईचा आगडोंब! एका महिन्यात श्रीलंका उद्ध्वस्त; तांदूळ 500 रुपये किलो तर सिलिंडर 4,119 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 05:17 PM2022-03-31T17:17:43+5:302022-03-31T17:27:54+5:30
Sri lanka Crisis : महागाईचा आगडोंब पाहायला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस खरेदी करण्यासाठी लोकांना मोठमोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत.
भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेत अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेच्या करन्सीची व्हॅल्यू ही डॉलरच्या तुलनेत आता जवळपास अर्धी झाली आहे. ज्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. श्रीलंकेत महागाईचा आगडोंब पाहायला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस खरेदी करण्यासाठी लोकांना मोठमोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की एक किलो साखरेसाठी 290 रुपये तर एक किलो तांदूळ घेण्यासाठी तब्बल 500 रुपये मोजावे लागत आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार, श्रीलंकेच महागाईचा दर 17 टक्क्यांहून पुढे गेला आहे. यामुळेच श्रीलंकसमोर आता गंभीर संकट निर्माण झालं आहे. एक कप चहासाठी 100 रुपये द्यावे लागत आहेत. तर ब्रेड, दूध यासारख्या पदार्थांसाठी देखील मोठी किंमत चुकवावी लागत आहे. ब्रेडचं एक पॅकेट 150 रुपयांना तर एक किलो दूध पावडर 1975, एलपीजी सिलिंडर 4119, पेट्रोल 254 तर डिझेल 176 रुपये प्रति लीटर आहे. श्रीलंका सध्या खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जीवनावश्यक सर्वच सामान हे अत्यंत महाग झालं आहे. जर या किमती अशाच राहिल्या तर उद्या कुटुंबाला काय खायला घालणार याची आता लोकांना खूप भीती वाटू लागली आहे.
गॅसचा तुटवडा असल्याने ब्रेडच्या किमती दुप्पट
जीवनावश्यक वस्तू, औषधं आणि इंधनासहित अनेक गोष्टी श्रीलंका परदेशातून आयात करू शकत नाही. श्रीलंकेत घरगुती गॅस सिलिंडरचा देखील मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.क ज्यामुळे एक हजार बेकऱ्या या बंद पडल्य़ा आहेत. आठवडाभरपूर्वी इंडस्ट्री असोसिएशनने याबाबत माहिती दिली होती. देशामध्ये इंधनाची कमतरता असल्याने काही ठिकाणी विजेवर चालणारी यंत्रणा बंद करावी लागली आहे. दिवसभरात तब्बल सात तास वीजपुरवठा हा खंडीत केला जातो. एन. के सीलोन बेकरी ओनर्स असोशिएशनचे अध्यक्ष जयवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही शहरी भागांमध्ये गॅसचा तुटवडा असल्याने ब्रेडच्या किमती दुप्पट झाल्या आहे.
सर्वसामान्यांवर गंभीर परिणाम
ब्रेडसाठी जवळपास 150 श्रीलंकाई रुपये (0.75 डॉलर) मोजावे लागत आहे. जर एक आठवडा अशीच परिस्थिती राहिली तर 90 टक्के बेकऱ्या बंद कराव्या लागतील. सरकारने तातडीने यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. गॅसच्या तुटवड्याचा परिणाम हा अनेक छोट्या रेस्टॉरंट्सवर होत आहे. पण सर्वसामान्य माणसांवर देखील गंभीर परिणाम होत आहे. श्रीलंकेतील या भीषण परिस्थितीचा फटका हा फक्त गरिबांनाच बसत नाही. तर चांगलं उत्पन्न असणाऱ्या नोकरदारवर्गाला देखील बसत आहे. आपल्या गरजा पूर्ण करणं देखील अत्यंत अवघड झालं आहे. भाज्याच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्या भाज्या देखील खरेदी करू शकत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.