अमेरिकेत कर्मचारी कपात थांबता थांबेना; लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञांच्याही नोकऱ्या गेल्या, ‘यूएसएड’पाठोपाठ इतर विभागांवरही बालंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 07:36 IST2025-03-01T07:35:59+5:302025-03-01T07:36:21+5:30
America Lay Offs: अमेरिकेत प्रशासकीय खर्चावर आवर घालण्याच्या दृष्टीने ही कर्मचारी कपात सुरू आहे.

अमेरिकेत कर्मचारी कपात थांबता थांबेना; लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञांच्याही नोकऱ्या गेल्या, ‘यूएसएड’पाठोपाठ इतर विभागांवरही बालंट
वॉशिंग्टन : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात सरकारी विभागांत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कपातीची मोहीम तीव्र होत चालली असून ‘यूएसएड’पाठोपाठ आता हवामान खाते आणि सामाजिक सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही बालंट आले आहे. दुसरीकडे, सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांच्या बडतर्फीमुळे नवा वाद पेटला आहे.
संरक्षण दलातही हादरा
ट्रम्प यांनी ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला असून, अमेरिकेच्या पाच माजी संरक्षणमंत्र्यांनी या ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बडतर्फीवर अमेरिकी काँग्रेसने तातडिने सुनावणी घ्यावी, अशी मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी नौदलप्रमुख ॲड. लिसा फ्रेंचेटी, हवाईदलाचे उपप्रमुख जन. जिम स्लाईफ, तसेच लष्करी सेवेत नियुक्त न्यायाधीशांना पदावरून हटवले होते. तत्पूर्वी ट्रम्प यांनी हवाई दलाचे प्रमुख जनरल सी. क्यू. ब्राऊन यांना प्रमुखपदावरून काढून टाकले होते. अमेरिकेत प्रशासकीय खर्चावर आवर घालण्याच्या दृष्टीने ही कर्मचारी कपात सुरू आहे. (वृत्तसंस्था)
लाभार्थींवर होणार थेट परिणाम
सामाजिक सुरक्षा विभागातील कर्मचारी कपातीमुळे अमेरिकेत सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ घेणाऱ्या सुमारे ७२.५ दशलक्ष लाभार्थींवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. या योजनांचे लाभ दिले जात असताना ही सेवा मोजक्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देणे शक्य नसल्याचे काँग्रेसमधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.
शास्त्रज्ञांच्याही गेल्या नोकऱ्या
ट्रम्प प्रशासनाने हवामानतज्ज्ञांसह या विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. महासागर व हवामानविषयक प्रशासनातील तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त कर्मचाऱ्यांनाही आता काढून टाकण्यात आले आहे. हवामानशास्त्र विभागातील तज्ज्ञ शास्त्रज्ञही यातून सुटलेले नाहीत.
भरल्या डोळ्यांनी घेतला निरोप
‘यूएसएड’अर्थात युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या बंद करण्यात आलेल्या संस्थेच्या मुख्यालयातून शुक्रवारी शेकडो कर्मचाऱ्यांनी भरल्या डोळ्यांनी निरोप घेतला.
अमेरिकी काँग्रेसच्या मंजुरीनंतर ही घटनात्मक संस्था स्थापन करण्यात आली होती. या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेले ९० टक्के करार आता रद्द करण्यात आले आहेत.
सामाजिक सुरक्षा विभागाला धक्के
अमेरिकेतील सामाजिक सुरक्षा विभागांतील सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांपैकी ७,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून, ही कपात ५० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. इलॉन मस्क यांच्या आखत्यारितील सरकारी दक्षता विभागाच्या माध्यमातून हे निर्णय घेतले जात आहेत.