सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी; ५६ मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 06:18 AM2020-01-08T06:18:00+5:302020-01-08T06:18:57+5:30
इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला १५ लाखांहून अधिक लोक जमले होते.
तेहरान : इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला १५ लाखांहून अधिक लोक जमले होते. अंत्ययात्रेच्या वेळी प्रचंड चेंगराचेंगरी झाली. त्यात ५६ जण मरण पावले असून, २०० जण जखमी झाले आहेत. इराणचे कमांडर जनरल सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत करमान येथे मोठा जनसमुदाय उसळला होता. चेंगराचेंगरी का झाली? याबाबत माहिती मिळू शकली नाही. आॅनलाइन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यांवर मृतदेह पडलेले दिसून येत नव्हते. तर, अन्य लोक मदत मागत होते. अंत्यसंस्कारासाठी १५ लाख लोक एकत्र आले होते असे सांगितले जात आहे.
इराकने आपल्या देशातील अमेरिकन सैन्याने माघारी निघून जावे, असा ठराव पार्लमेंटमध्ये केला असला तरी आम्ही सैन्य बिलकुल मागे घेणार नाही, असे अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनीही जाहीर केले आहे. परिणामी हा तिढा सुटण्याची शक्यता नाही, असे जाणकारांचे म्हणणे
आहे.
कासीम सुलेमानी यांची अमेरिकेने हवाई हल्ल्याद्वारे हत्या केल्याने इराणमध्ये कमालीची संतापाची लाट आहे. सुलेमानी यांचे इराण व आसपासच्या देशांत वाढणारे प्रस्थ अमेरिकेला खुपत होते. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली.
एरवी अमेरिकेला थेट दुखावण्याचा सुलेमानी यांनी प्रयत्नही केला नव्हता; पण इराणमधील सत्ताधारी व लष्करप्रमुख आपल्याला सोयीचा असावा, अशी अमेरिकेची इच्छा होती. त्यापुढे इराण न झुकल्यानेच सुलेमानी यांना मारण्यात आले, अशी इराणमधील सर्वसामान्यांची धारणा आहे.
इराणचे सरकार वा लष्करच नव्हे, तर सामान्य जनताही अमेरिकेचा बदला घेण्याची भाषा करीत आहे.
ट्रम्प यांच्या शिरच्छेदासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत, अशी भाषा इराणमध्ये सुरू झाली आहे. त्या जनतेला शांत करणे, हे इराण सरकारपुढील आव्हान असणार आहे; पण आम्हाला धमक्या देण्याच्या फंदात पडू नका, असा इशारा इराणचे सर्वोच्च प्रमुख अयातोल्ला अली खामेनी यांनी दिला आहे. (वृत्तसंस्था)
>इराणमध्ये अण्वस्त्रे ठेवूच देणार नाही -ट्रम्प
इराणचे कमांडर मेजर जनरल कासीम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराणने संपूर्ण अमेरिकेच्या लष्करालाच दहशतवादी ठरविले आहे, तसेच नवीन कमांडर मेजर जनरल इस्माईल घनी यांनी अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या सर्व जागा पेटवून टाकण्याची धमकी दिली आहे.
दुसरीकडे इराणमध्ये अण्वस्त्रे ठेवूच देणार नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका व इराणमधील संघर्ष अधिक वाढेल आणि बराच काळ सुरू राहील, असे दिसू लागले आहे.
इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर अमेरिका हल्ले करणार की काय, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास मध्य आशियाला महायुद्धाचे चटकेच बसतील.