‘काश्मिरींच्या पाठीशी उभे राहणे हा जिहादच’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 04:35 AM2019-10-01T04:35:42+5:302019-10-01T04:36:36+5:30
काश्मिरी जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे जिहाद केल्यासारखेच आहे आणि जगाने जरी पाठ फिरविली तरी पाकिस्तान काश्मिरींना कायम पाठिंबा देतच राहील
इस्लामाबाद : काश्मिरी जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे जिहाद केल्यासारखेच आहे आणि जगाने जरी पाठ फिरविली तरी पाकिस्तान काश्मिरींना कायम पाठिंबा देतच राहील, अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी ते अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेथून रविवारी पाकिस्तानला परतल्यानंतर इस्लामाबाद विमानतळाच्या बाहेर आपल्या पक्षकार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात त्यांनी हे उद्गार काढले. इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत शुक्रवारी केलेल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता. प्रत्येक देशाच्या प्रमुखाला आमसभेत भाषण करण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येतो. मात्र, इम्रान खान यांनी सुमारे ५० मिनिटे भाषण केले. त्यांच्या भाषणाचा अर्धा भाग हा काश्मीरशी संबंधित मुद्यांनीच व्यापलेला होता. ते म्हणाले होते की, काश्मीरमधील राजकीय बंद्यांची त्वरित मुक्तता करण्यात यावी.
इम्रान खान म्हणाले की, काश्मिरी लोकांसाठी पाकिस्तान लढत राहणार आहे. सध्याचा काळ आपल्याला अनुकूल नसल्याने दु:खी व्हायचे काहीही कारण नाही. पाकिस्तानी लोकांचा पाठिंबा मिळाला तर काश्मिरी नक्की विजयी होतील.