स्टार फुटबॉलपटू मेसीला दणका, 21 महिने तुरुंगवासाची शिक्षा कायम
By admin | Published: May 24, 2017 05:51 PM2017-05-24T17:51:13+5:302017-05-24T19:42:27+5:30
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसीला स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दणका दिला.
Next
>ऑनलाइन लोकमत
बार्सिलोना, दि. 24 - अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसीला स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दणका दिला. मेसीची 21 महिने तुरूंगवासाची शिक्षा स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. तसेच भारतीय चलनानुसार त्याला जवळपास 14 कोटी, 50 लाख रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. जगातील सर्वात महागड्या फुटबॉलपटूंमध्ये गणना होणा-या मेसी आणि त्याच्या वडिलांवर कर घोटाळयाचा आरोप आहे.
मेसीने 40 लाख युरोचा कर भरण्याचे टाळून स्पेनची फसवणूक केली असा आरोप त्याच्यावर आहे. गेल्यावर्षी 6 जुलै रोजी कर चुकवेगिरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये बार्सिलोनाच्या न्यायालयाने मेसी आणि त्याचे वडील जॉर्ज यांना दोषी ठरवले होते. न्यायालयाने दोघांना 21 महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर मेसीला 20 लाख युरोचा दंडही ठोठावला होता. मेसीने या शिक्षेविरोधात स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आज झालेल्या सुनावणीत स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने मेसीची शिक्षा कायम ठेवली आहे.
मेसी आणि त्याचे वडिल जॉर्ज मेसी यांनी कर टाळण्यासाठी बनावट कंपन्यांच्या साखळीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २००७-०९ मध्ये मेसीने त्याचे इमेज राईट विकले होते त्यातून मिळालेल्या उत्पन्नात कर चुकवेगिरीचा आरोप आहे.