Starbucks ला कॉफीच पडली महागात, द्यावे लागले ४३४ कोटी, एका चुकीनं मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 10:46 IST2025-03-19T10:41:53+5:302025-03-19T10:46:53+5:30

स्टारबक्स कंपनीला एका डिलिव्हरी बॉयला ४३४ कोटींची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

Starbucks coffee burnt a customer private parts company will have to pay 435 crore rupees as compensation | Starbucks ला कॉफीच पडली महागात, द्यावे लागले ४३४ कोटी, एका चुकीनं मोठा फटका

Starbucks ला कॉफीच पडली महागात, द्यावे लागले ४३४ कोटी, एका चुकीनं मोठा फटका

Starbucks Compensation: जगातल्या ८० देशांमध्ये ३० हजार दुकानं असणारी स्टारबक्स कंपनी आज एका प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. १९७१ मध्ये, पहिले स्टारबक्स स्टोअर अमेरिकेतील सिएटल येथे एका चौकात उघडण्यात आले होतं. अर्धशतक उलटून गेले आहे आणि आजही स्टारबक्स ही कॉफी शॉपची सर्वात मोठी साखळी आहे. मात्र आता त्यांच्या कॉफीमुळेच स्टारबक्सला ४३४ कोटींचा दंड भरावा लागणार आहे. एका डिलिव्हरी बॉयने केलेल्या तक्रारीनंतर स्टारबक्स कंपनीला मोठा फटका बसला आहे.

कॅलिफोर्नियातील न्यायालयाने स्टारबक्सला डिलिव्हरी बॉयला ५० दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे ४३४ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. स्टारबक्स कॉफीमुळे गंभीररीत्या भाजलेल्या डिलिव्हरी बॉयला हा दंड द्यावा लागणार आहे. डिलिव्हरी बॉयने स्टारबक्स आउटलेटमधून कॉफी घेतली होती. मात्र कॉफीच्या ग्लासचे झाकण नीट बंद न केल्याने कॉफी त्याच्या मांडीवर सांडली आणि तो गंभीररित्या भाजला. त्यानंतर डिलिव्हरी बॉयने याप्रकरणी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. अखेर डिलिव्हरी बॉयने ही केस जिंकली आणि आता त्याला नुकसनाभरपाई मिळणार आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, ८ फेब्रुवारी २०२० रोजी म्हणजे पाच वर्षांपूर्वी हा सगळा प्रकार घडला. मायकेल गार्सिया नावाच्या डिलिव्हरी ड्रायव्हरने स्टारबक्स आउटलेटमधून कॉफी विकत घेतली. त्याने तीन सुपर साइज ड्रिंक्स ऑर्डर केल्या होत्या. त्या तीनपैकी एक कॉफी नीट पॅक केली नव्हती. मायकलने ट्रे हातात घेतला तेव्हा गरम कॉफी त्याच्या मांडीवर सांडली. त्यामुळे त्याचे गुप्तांग, कंबर आणि मांडीच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात भाजला. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

त्यानंतर मायकेलने स्टारबक्सविरोधात कोर्टात धाव घेतली. त्यानंतर कॅलिफोर्नियाच्या कोर्टाने मायकेलच्या बाजूने निर्णय दिला आणि कंपनीला ५० दशलक्ष डॉलर्सची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. या निर्णयावर स्टारबक्सकडून प्रतिक्रिया देण्यात आली. "या घटनेसाठी आम्ही दोषी आहोत पत्र न्यायालयाच्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही. कोर्टाने दिलेली नुकसानीची रक्कम जास्त आहे. आम्ही आमच्या स्टोअरमधील सुरक्षेसाठ  नेहमीच वचनबद्ध आहोत," असं स्टारबक्सच्या प्रवक्त्यांनी म्हटलं. या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचे स्टारबक्सने म्हटले आहे.

Web Title: Starbucks coffee burnt a customer private parts company will have to pay 435 crore rupees as compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.