अंतराळवीरांविनाच अखेर पृथ्वीवर परतले स्टारलायनर; सुनीता विलियम्स २०२५ मध्ये येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 06:50 AM2024-09-08T06:50:18+5:302024-09-08T06:50:55+5:30
अमेरिकेतील वाळवंटात यानाचे लँडिंग, सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला.
वॉशिंग्टन - अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातून परत आणणारे स्टारलायनर हे या अंतराळवीरांविनाच अखेर पृथ्वीवर उतरले. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी अमेरिकेतील न्यू मेक्सिको व्हाईट सँड स्पेस हार्बर या वाळवंटात उतरले.
स्टारलाईनर उतरल्यानंतर ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर हे ५ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर गेले होते. त्यांची मोहीम केवळ ८ दिवसांची होती. मात्र, त्यांना परत आणणाऱ्या यानात हिलियम वायू गळती झाली. त्यामुळे या यानातून त्यांना परत आणता येणार नाही, असे अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'ने स्पष्ट केले होते. आता त्यांना वर्ष २०२५ मध्ये परत आणण्यात येणार आहे.
६ तासांचा प्रवास
■ स्टारलाईनर अंतराळ केंद्रापासून पहाटे ३:३० वाजता वेगळे झाले.
■ सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला.
■ यानाने वातावरणात प्रवेश केला त्यावेळी त्याचा वेग ताशी २,७३५ किलोमीटर एवढा होता.
सुनीता विलियम्सने व्यक्त केला आनंद
स्टारलाईनर सुरक्षित उतरल्यानंतर अंतराळ केंद्रात सुनीता विलियम्स यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी नासाच्या टीमचे कौतुक करताना सांगितले की, तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात. तर, पूर्व अंतराळवीर गॅरेट रीसमॅन यांनी अंतराळयानाला रिकामे परत आणण्याचा निर्णय योग्य होता, असे सांगितले