Starlink Satellites: अंतराळात आले भीषण वादळ, स्टारलिंकच्या 40 सॅटेलाइट्स बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 11:16 AM2022-02-10T11:16:57+5:302022-02-10T11:17:01+5:30
Starlink Satellites: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने अंतराळात पाठवलेले 40 सॅटेलाइट भूचुंबकीय/सौर वादळामुळे बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (ElonMusk) यांना मोठा फटका बसला आहे. मस्क यांची कंपनी स्टारलिंकने अंतराळात पाठवलेले 40 सॅटेलाइट बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. प्रक्षेपणाच्या एका दिवसानंतर अंतराळात आलेल्या एका भूचुंबकीय वादळामुळे (Geomagnetic storm) स्टारलिंकचे हे 40 सॅटेलाइट बेपत्ता झाले आहेत.
एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने गुरुवारी माहिती देताना सांगितले की, फाल्कन 9 रॉकेटच्या माध्यमातून 49 स्टारलिंक उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवण्यात आले होते. पण, प्रक्षेपणाच्या एका दिवसानंतर अंतराळात आलेल्या मोठ्या भूचुंबकीय/सौर वादळात सापडून 40 सॅटेलाइट बेपत्ता झाले. दरम्यान, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने सॅटेलाइट नष्ट होण्याची घटना मोठी मानली जात आहे.
काय आहे भूचुंबकीय किंवा सौर वादळ ?
भूचुंबकीय किंवा सौर वादळे हे एकप्रकारचे सौर प्लाझ्मा आहेत. हे सौर पृष्ठभागावरुन अतिशय वेगाने बाहेर पडतात. सूर्यातून निघणाऱ्या सनस्पॉट्समुळे ही चुंबकीय ऊर्जा निघते आणि याचेच रुपांतर नंतर वादळात होते. ही वादळे काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत टिकू शकतात. स्टारलिंकच्या उपग्रहांवर परिणाम करणारे हे सौर वादळ 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी आले होते. 3 फेब्रुवारी रोजी या सौर वादळाबाबत माहिती समोर आली.
सर्वात मोठे वादळ
कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) च्या सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस इंडिया (CESSI) चे प्रमुख भौतिकशास्त्रज्ञ दिव्येंदू नंदी म्हणतात की, हे सौर वादळ असामान्य आणि मोठे होते. अशाप्रकाचे वादळ आतापर्यंत कधीच पाहिले गेले नाही.