CoronaVirus News: अमेरिकेतील निम्म्या राज्यांकडून निर्बंध शिथिल करण्यास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 04:38 AM2020-05-02T04:38:51+5:302020-05-02T04:39:08+5:30
देशातील एकूण राज्यांपैकी निम्म्या राज्यांनी सध्या लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास सुरुवात केली आहे.
वॉशिंग्टन : कोरोना साथीमुळे बहुतांश उद्योगधंदे बंद असल्यामुळे अमेरिकेत बेकारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातून आणखी समस्या निर्माण होऊ नये याकरिता त्या देशातील एकूण राज्यांपैकी निम्म्या राज्यांनी सध्या लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेतील प्रत्येक राज्यात कोरोना फैलावाची स्थिती निरनिराळी आहे. त्यानुसार या राज्यांतील प्रशासन रेस्टॉरंट, किरकोळ व्यापार व अन्य उद्योग-धंद्यांवरील निर्बंध किती प्रमाणात शिथिल करावेत याचा निर्णय घेणार आहे. कोरोना साथीच्या तडाख्यामुळे अमेरिकेमध्ये सुमारे ३ कोटी लोक ांनी बेकारी भत्ता मिळावा म्हणून आपल्या नावाची नोंदणी सरकार दरबारी केली आहे. हे बेकारी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचेच हे निदर्शक आहे. ही समस्या अधिक उग्र होऊ नये म्हणून निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत होती. अमेरिकेतील एकूण कामगारांपैकी १८.४ टक्के लोक सध्या बेकार झाले असावेत, असा एक अंदाज आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक आहे. त्यासाठी अमेरिकेतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
>थर्मल स्क्रिनिंगच्या सुविधेचा विस्तार करा
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅलर्जी अँड इनफेक्शियस डिसिजेस (एनआयएआयडी) या संस्थेचे संचालक डॉ. अँथनी फॉसी यांनी सांगितले की, अमेरिकेतील विविध राज्यांनी निर्बंध शिथील केले तरी काही गोष्टींची दक्षता मोठ्या प्रमाणावर घ्यावी लागेल. नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्याच्या सुविधेचा आणखी विस्तार करावा लागेल. नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंग व्यवस्थित न पाळले गेल्यास ही साथ पुन्हा डोके वर काढू शकते.