युनोच्या हवामान परिषदेस पेरूत प्रारंभ
By admin | Published: December 1, 2014 11:56 PM2014-12-01T23:56:56+5:302014-12-01T23:56:56+5:30
संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) हवामान परिषदेसाठी सोमवारी भारतासह १९० देशांचे प्रतिनिधी येथे गोळा झाले
लीमा (पेरू) : संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) हवामान परिषदेसाठी सोमवारी भारतासह १९० देशांचे प्रतिनिधी येथे गोळा झाले असून जागतिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीच्या नव्या महत्त्वाकांक्षी आणि बंधनकारक करारावर ते वाटाघाटी करणार आहेत. पुढील वर्षी पॅरिसमध्ये स्वीकारण्यात येणाऱ्या या ऐतिहासिक करारावर सर्वसंमती घडवून आणण्याची अखेरची संधी म्हणून या वाटाघाटींकडे पाहिले जाते.
कार्बन उत्सर्जन कपातीसाठी गेल्या दोन दशकांपासून वाटाघाटी सुरू आहेत. प्रदूषणांच्या इतर स्रोतांसह कोळसा ज्वलन, तसेच जीवाश्म इंधन वापरण्याच्या घातक परिणामांना आळा घालण्याकरिता युनो आपल्या सदस्य देशांना एकत्रित आणण्याचे अथक प्रयत्न करीत आहे. पेरूच्या राजधानीत १२ दिवस ही परिषद चालणार असून सहभागी प्रतिनिधी २०१५च्या पॅरिस करारासाठी ते कोणते योगदान देणार आहेत याची योजना मांडतील. भारताचे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे भारताच्या १७ सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत आहेत. हे शिष्टमंडळ लिमात पॅरिसमध्ये होणाऱ्या अंतिम करारातील तरतुदींवर वाटाघाटी करणार आहे. हा करार २०२० मध्ये अमलात आणावयाचा आहे. (वृत्तसंस्था)