फुटबॉल टीमला काढण्यासाठी डोंगराचे कडे खोदणे सुरू, नौदलाकडून १00 ठिकाणी खोदकाम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 04:50 AM2018-07-08T04:50:57+5:302018-07-08T04:51:10+5:30
गेल्या दोन आठवड्यांपासून थायलंडमधील सर्वात मोठ्या गुहेत अडकलेल्या लहान मुलांच्या फुटबॉल संघाला व त्यांच्या प्रशिक्षकाला बाहेर काढण्यासाठी ज्या डोंगरात ती गुहा आहे, त्या डोंगराचा कडा ड्रिल मशिनने किमान १00 ठिकाणी खोदून त्यांचा शोध घेण्याचे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
माए साई - गेल्या दोन आठवड्यांपासून थायलंडमधील सर्वात मोठ्या गुहेत अडकलेल्या लहान मुलांच्या फुटबॉल संघाला व त्यांच्या प्रशिक्षकाला बाहेर काढण्यासाठी ज्या डोंगरात ती गुहा आहे, त्या डोंगराचा कडा ड्रिल मशिनने किमान १00 ठिकाणी खोदून त्यांचा शोध घेण्याचे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसे केल्याने या मुलांपर्यंत शक्य होईल, असे नौदलाच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.
त्यांना बाहेर काढण्याचे काम थायलंडच्या नौदलाकडे सोपविण्यात आले आहे. त्यांना मदत करण्यासाठी एका माजी नौदल सैनिक या मोहिमेत सहभागी झाला होता. तो गुहेच्या आतील भागात गेल्यानंतर तेथील प्राणवायुचा पुरवठा थांबल्याने तो मरण पावला. त्याच्याबद्दल देशभर दु:ख व्यक्त होत असून, या मुलांची प्रत्यक्ष सुटका व्हावी, यासाठी सर्वत्र प्रार्थना सुरू आहेत.
नौदलाने डोंगराच्या कड्याचा भाग १00 ठिकाणी ड्रिल मशिनने खणण्याचे काम सुरू केले असून, एका विशिष्ट ठिकाणी तब्बल ४00 मीटर खोल ते काम केले. तरीही ती मुले नेमकी कुठे आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. आणखी २00 मीटर खोलवर खणत राहावे लागेल, असा अंदाज आहे, असे या मोहिमेच्या प्रमुखाने म्हटले आहे. मात्र, आतमध्ये अडकलेल्या सर्वांना प्राणवायूचा पुरवठा होत राहावा, यासाठी पाइपलाइन टाकून पूर्ण झाली आहे. त्यामुळे मुले व प्रशिक्षकांना श्वासोच्छवासात कोणतेही अडथळे आलेले नाहीत.
वर्ल्डकप फायनलचे निमंत्रण
सध्या रशियात वर्ल्ड कप फुटबॉलचे सामने सुरू आहेत. फिफाच्या अध्यक्षांनी आत अडकलेल्या सर्व मुलांच्या सुटकेसाठी प्रार्थना करतानाच, सुटकेनंतर त्यांना अंतिम सामना पाहायला येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे ही मुले आनंदून गेली आहेत. (वृत्तसंस्था)
प्रशिक्षकाने मागितली माफी
दरम्यान, फुटबॉल टीमच्या प्रशिक्षकाने सर्व मुलांच्या पालकांची माफी मागितली आहे. तुमची सर्व मुले सुखरूप आहेत, मी त्यांची काळजी घेईनच, पण सर्व पालकांची मी माफी मागतो, असे प्रशिक्षकाने लिहिले आहे. तुम्ही दिलेल्या मानसिक पाठिंब्यासाठी मी आभारी आहे, असेही त्याने पत्रात नमूद केले आहे. या सर्व मुलांशी संपर्क झाला आहे, पण त्यांना बाहेर काढण्यात सतत काही ना काही अडचणी येत आहेत.