उपाशी, रिकामा होत चाललेला देश आणि बॅले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 10:38 AM2022-10-28T10:38:19+5:302022-10-28T10:38:50+5:30
वाल्देस मुळात या कंपनीची डायरेक्टर झाली तीच खडतर परिस्थितीत. तिच्या आधी क्युबाच्या नॅशनल बॅले कंपनीची डायरेक्टर होती ती क्युबाची सगळ्यात मोठी स्टार बॅलेरिना अलिशिया अलोन्सो.
विंगसे वाल्देस ही क्युबाची सुप्रसिद्ध बॅलेरिना येत्या २ नोव्हेंबरला क्युबाच्या नॅशनल थिएटरमध्ये तिची कला सादर करणार आहे. तिने २५ वर्षांपूर्वी गिझेल नावाचं पात्र पहिल्यांदा सादर केलं होतं. २ नोव्हेंबर रोजी ती पुन्हा एकदा तेच पात्र सादर करणार आहे. मात्र यावेळी हे सादरीकरण ती हवानाच्या सगळ्यात प्रसिद्ध अशा ग्रॅन टिएट्रो डे ला हवाना अलिशिया अलोन्सो नावाच्या सभागृहात सादर करू शकणार नाही. कारण आजघडीला या प्रसिद्ध सभागृहाला मोठ्या प्रमाणात वाळवी लागलेली आहे. त्याऐवजी ती ज्या नॅशनल थिएटरमध्ये तिचा प्रयोग करणार आहे तो रंगमंचदेखील तिच्या सादरीकरणाच्या वेळी कोलमडणार नाही अशी तिला आशा आहे.
४४ वर्षांच्या वाल्देसने नुकतीच क्युबाच्या नॅशनल बॅले कंपनीची सूत्र डायरेक्टर म्हणून हाती घेतली आहेत. थिएटरच्या आत्ताच्या अवस्थेबद्दल ती म्हणते, "या थिएटरची अशी अवस्था असणं हे फारच वेदनादायक आहे. कारण ते थिएटर हे क्युबाच्या नॅशनल बॅले कंपनीचं घर असल्यासारखं आहे. आणि खरं तर माझी इच्छा तिथे आंतरराष्ट्रीय बॅले महोत्सव भरवण्याची आहे. पण आज परिस्थिती अशी आहे, की गेली दीड वर्षं तर तिथे दुरुस्ती कामच सुरु आहे."
वाल्देस मुळात या कंपनीची डायरेक्टर झाली तीच खडतर परिस्थितीत. तिच्या आधी क्युबाच्या नॅशनल बॅले कंपनीची डायरेक्टर होती ती क्युबाची सगळ्यात मोठी स्टार बॅलेरिना अलिशिया अलोन्सो. अलिशिया अलोन्सोला खुद्द फिडेल कॅस्ट्रो यांनी विनंती करून क्युबाला परत बोलावून घेतलं होतं.
कॅस्ट्रो यांची अशी इच्छा होती, की अलोन्सोने क्युबाची स्वतःची उत्तम बॅले कंपनी उभी करावी. त्या बॅले कंपनीने असं काम करावं की क्युबाच्या प्रत्येक नागरिकाला तिचा अभिमान वाटेल. आणि अलोन्सोने अक्षरशः जिवाचं रान करून ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. तिच्या सुवर्णकाळात ती क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो इतकीच लोकप्रिय होती. मात्र नंतर नंतर तिचे प्रयोग हे स्वतःभोवती आरत्या ओवाळणारे ठरू लागले. त्यातून अनेक उत्तर बॅले कलाकार या कंपनीला सोडून गेले. मात्र अशा परिस्थितीतही वाल्देस अलोन्सोबरोबर राहिली. ती म्हणते, की मी ३० वर्षांच्या काळात अलोन्सोकडून खूप काही शिकले. माझं स्वतःचं बॅलेरिना म्हणून आंतरराष्ट्रीय करिअर होतं. मी जपानपासून इजिप्तच्या पिरॅमिड्सपर्यंत अनेक ठिकाणी नृत्य सादर केलेलं आहे. त्यानंतर आपल्या देशात परत येऊन नृत्य सादर करण्यातला आनंद काही वेगळाच असायचा."
अलिशिया अलोन्सोचं ऑक्टोबर २०१९ मध्ये वयाच्या ९८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यानंतर तिची उत्तराधिकारी म्हणून वाल्देसच्या खांद्यावर क्युबाच्या नॅशनल बॅले कंपनीची धुरा आली. डायरेक्टर झाल्यानंतर वाल्देसच्या समोर एकापाठोपाठ एक संकटांची मालिकाच उभी राहिली. सगळ्यात आधी तर २०२० साली कोरोनाच्या काळातल्या लॉकडाऊनचा बॅलेला फटका बसला. आता वीजकपातीचं संकट तिच्यासमोर आ वासून उभं आहे. क्युबामध्ये असलेला अन्नधान्याचा तुटवडा, कोलमडणारी आहेत. थिएटर्स आणि मोठ्या प्रमाणात देश सोडून जाणारे क्युबन तरुण लोक या सगळ्याला तोंड देत क्युबामध्ये बॅले कंपनी पुन्हा उभी करायचं आव्हान वाल्देससमोर आहे ती म्हणते, की "या सगळ्या अडचणी कमी होत्या म्हणून की काय, पण ही सगळी तयारी चालू असताना मी एका बाळाला जन्म दिला."
अर्थात अलोन्सो जरी क्युबाची आद्य बॅलेरिना असली, तरी तिची कारकीर्द काही वादातीत नव्हती. तिच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले होते. विशेषतः कृष्णवर्णीय बॅले नर्तक- नर्तिकांना तिने कायम उपेक्षित ठेवलं असा आरोप तिच्यावर झाला होता. त्यामानाने वाल्देसने तिच्या वाट्याला आलेली परिस्थिती अधिक चांगली हाताळली आहे. आजघडीला तिच्याबरोबर ७० नृत्यांगणांचा ताफा आहे. इतकंच नाही, तर त्यापैकी वीस नर्तक तिने कोरोनाच्या कठीण काळात कंपनीशी जोडून घेतलेले आहेत.वाल्देस तिच्या बाजूने जमेल तेवढे प्रयत्न करते आहे, मात्र आपल्या पुढ्यात नक्की काय वाढून ठेवलेले आहे हे तिला माहीत नाही. तरुण लोक देश सोडून जात असताना तुला या बॅलेची काय काळजी, असं तिला विचारणारे लोकही आहेतच!
नक्की काय होणार?
या वर्षात सुमारे दोन लाख क्युबन्स देश सोडून गेले आहेत. त्यात बॅले कंपनीच्या जवळजवळ २० नर्तक आणि नर्तिकांचा समावेश आहे. असे एकामागून येणारे एकेक धक्के नॅशनल बॅले कंपनी पचवू शकेल का? आणि वाल्देस कंपनीला तिचा सुवर्णकाळ पुन्हा मिळवून देऊ शकेल का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत, हे खरेच!