अमेरिकेतही पुतळ्यांचे राजकारण; कोलंबियात हटविला कोलंबसाचा पुतळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 02:31 AM2020-06-14T02:31:33+5:302020-06-14T06:54:05+5:30
अज्ञात व्यक्तींकडून विटंबना : तणाव टाळण्यासाठी महापालिकेने अमेरिकेच्या शोधकर्त्याचा पुतळा वखारीत हलविला
कोलंबिया (अमेरिका) : अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिना प्रांतातील कोलंबिया शहरात अमेरिकेचा शोधकर्ता क्रिस्टोफर कोलंबस याच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर स्थानिक महानगरपालिकेने हा पुतळा वखारीत हलविला आहे. या शहराला कोलंबिया हे नावच मुळात कोलंबस याच्या सन्मानार्थ १७८६ साली देण्यात आले होते. त्याच्याच पुतळ्याला शहरात जागा नसल्यासारखी स्थिती आता निर्माण झाली आहे.
तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड नामक अश्वेत व्यक्तीचा पोलीस अत्याचारात मृत्यू झाला होता. त्यावरून अमेरिकेत वर्णभेदविरोधी आंदोलकांचा भडका उडाला असून त्यातूनच क्रिस्टोफर कोलंबस याच्या पुतळ्याची ही विटंबना झाली आहे. अमेरिकेच्या इतरही अनेक भागांत आंदोलक कोलंबसच्या पुतळ्याला लक्ष्य करीत आहेत. गेल्या आठवड्यात आंदोलकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचीही विटंबना केली होती. वसाहत काळातील इतरही अनेक वसाहतवादी नेत्यांच्या पुतळ्यांना आंदोलक लक्ष्य करत आहेत.
कोलंबियातील रिव्हरफ्रंट स्थित उद्यानात कोलंबस याचा हा पुतळा होता. कोलंबिया कालवा आणि कोंगरी नदी यांच्यामधील लोकप्रिय पाऊलवाटेवर हा पुतळा उभा होता. शुक्रवारी सकाळी या पुतळ्याची विटंबना झाल्याचे आढळून आले. महानगरपालिकेच्या पथकाने हा पुतळा हटविला. नंतर तो सुरक्षितरीत्या वखारीत हलविण्यात आला.
कोलंबियाचे महापौर स्टीव्ह बेंजामिन यांनी सांगितले की, ‘हा पुतळा किती दिवस भांडारगृहात ठेवायचा, याचा निर्णय शहराची परिषद, नागरिक आणि अधिकारी हेच घेतील. या सर्व संबंधितांशी विस्तृत चर्चा केली जाईल. तोपर्यंत पुतळा भांडारगृहातच राहील. मध्यरात्री येऊन तोडफोड करणारे लोक कोलंबस याच्या पुतळ्याचे भवितव्य ठरवू शकत नाहीत.’
कोलंबियामध्ये कोलंबसाच्या पुतळ्याची विटंबना होण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्याच आठवड्यात याच पुतळ्यावर पेंट फेकण्यात आला होता. पुतळ्याला गंभीर क्षती निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन पुतळा सुरक्षितरीत्या हलविण्यात आला आहे, असे महापौर बेंजामिन यांनी सांगितले.
क्रिस्टोफर कोलंबस हा इटालियन दर्यावर्दी होता. त्याने १४९२ मध्ये अमेरिकेचा शोध लावला होता. मोठी समुद्रसफर करून कोलंबस उत्तर अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचला होता. मानवी साहसाचे प्रतीक म्हणून कोलंबस याच्याकडे पाहिले जाते. अलीकडे मात्र कोलंबस हा अमेरिकेत अप्रिय झाला आहे. अमेरिकेतील स्वतंत्रतावादी लोक कोलंबस याच्याकडे साम्राज्यवाद आणि वसाहतवादाचे प्रतीक म्हणून पाहू लागले आहेत. अमेरिकेवर युरोपीयांनी ताबा घेताना लाखो स्थानिक मूळ निवासी नागरिकांची कत्तल केली, लाखांचे शोषण केले. याची सुरुवात कोलंबस याने करून दिली होती, असे टीकाकार मानतात. त्यामुळे त्याच्याकडे वर्णद्वेष आणि अन्यायाचे प्रतीक म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.
पुतळा पुन्हा पूर्ववत बसविला जाईलच असे नाही!
कोलंबियामधील कोलंबसाचा पुतळा ‘डॉटर्स आॅफ अमेरिकन रिव्होल्यूशन’ (डीएआर) या संस्थेने भेट दिलेला आहे. कोलंबियाचे महापौर बेंजामिन यांनी सांगितले की, पुतळा हटविण्यात येत असल्याची माहिती ‘डीएआर’ला देण्यात आली होती. हा पुतळा पूर्ववत बसविण्याबाबत अनिश्चितता असल्याचे संकेत यांच्या वक्तव्यातून मिळाले. बेंजामिन यांनी म्हटले की, पुतळ्याचे काय करायचे याबाबत आम्ही लोकांकडून सूचना मागवीत आहोत. पुतळ्याला योग्य जागा मिळायला हवी, अशी आमची भूमिका आहे. तो आधी जिथे होता, तिथेच पुन्हा पाठविला जाऊ शकतो किंवा अन्य ठिकाणीही जाऊ शकतो.
क्रिस्टोफर कोलंबस याच्या स्मरणार्थ देण्यात येणाºया सुटीच्या पार्श्वभूमीवर १४ आॅक्टोबर २०१९ रोजी अमेरिकेच्या ºहोड आयलँड प्रातांतील कोलंबसाच्या पुतळ्याला वसाहतवाद विरोधकांनी असा पेंट फासून निषेध व्यक्त केला होता. ‘स्टॉप सेलिब्रटिंग जिनॉसाईड’ म्हणजेच ‘वंशविच्छेद साजरा करणे थांबवा’, असा संदेश पुतळ्याच्या चौथºयावर आंदोलकांनी लिहिला होता.
अनेक शहरांत कोलंबसच्या पुतळ्याची विटंबना
क्रिस्टोफर कोलंबस याच्या पुतळ्याची विटंबना अमेरिकेच्या अन्य शहरांतही होताना दिसत आहे. याच आठवड्यात मिनिसोटामध्ये राजधानीच्या शहरातील कोलंबस याचा पुतळा आंदोलकांनी उखडून टाकला. रिचमंड येथील एका उद्यानातील पुतळाही आंदोलकांनी उखडून एका तलावात फेकून दिला. बोस्टन येथे कोलंबसच्या पुतळ्याचे शिर आंदोलकांनी धडावेगळे केले.
सरकारांनी सुटीचे नावच बदलले!
अमेरिकेत कोलंबसविरोधी वातावरण तयार झाल्यामुळे अनेक राज्यांच्या सरकारांनी कोलंबसच्या सन्मानार्थ आॅक्टोबरमध्ये देण्यात येणाºया सुटीचे नाव बदलून ‘स्थानिक नागरिक दिन’ असे केले आहे. मूल निवासी नागरिकांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ हा बदल करण्यात आला आहे.