स्मोकर्सपासून चार हात लांबच राहा; धुरामुळे खाजेसह अन्य त्वचाविकार होण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 08:30 AM2022-10-16T08:30:16+5:302022-10-16T08:32:49+5:30
धूम्रपान करणाऱ्यांपासून चार हात लांब राहिलेलेच बरे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
कॅलिफोर्निया: धूम्रपान करणाऱ्यांच्या आसपास राहणाऱ्या लोकांना खाज आणि सोरायसिस यांसारखे त्वचा विकार होण्याचा धोका असल्याचा इशारा कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या एका संशोधनात देण्यात आला आहे. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांपासून चार हात लांब राहिलेलेच बरे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
धूम्रपान करणाऱ्या लोकांचा धूम्रपान न करणाऱ्या लोकांवर काय परिणाम होऊ शकतो, या विषयावर हे संशोधन करण्यात आले आहे. संशोधनातून धक्कादायक माहिती समाेर आली आहे. त्यात असे आढळून आले आहे की, तंबाखूच्या धुरापासून निघालेले घातक घटक धुळीला चिकटून बसतात. ते आतील पृष्ठभागावर अनिश्चित काळ राहू शकतात. धूम्रपान करणारे तर या घातक द्रव्यांच्या संपर्कात येतातच; पण सोबतचे धूम्रपान न करणारेही संपर्कात येतात.
या संशोधनाचा अहवाल ‘द लॅन्सेट फॅमिली ऑफ जर्नल्स’च्या ‘ई-बायोमेडिसिन’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. संशोधनात सहभागी असलेले शास्त्रज्ञ शेन सकामाकी चिंग यांनी सांगितले की, इतरांनी केलेल्या धूम्रपानाचा धूर मानवी त्वचेच्या संपर्कात आल्यामुळे खाज व सोरायसिससारख्या त्वचा विकाराची जोखीम वाढवितात, असे आम्हाला आढळून आले आहे. (वृत्तसंस्था)
८० लाख जणांचा मृत्यू
जागतिक आराेग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार तंबाखूमुळे जगभरात ८० लाख लाेकांचा दरवर्षी लवकर मृत्यू हाेताे. १२ लाख लाेकांना अप्रत्यक्ष फटका जे धुम्रपान करत नाही ७० लाख लाेकांचा मृत्यू हा तंबाखूच्या थेट वापरामुळे हाेताे.
त्वचेवाटे होतो संपर्क
सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला हाेणाऱ्या हानीएवढीच त्यांची हानीही घातक होती. त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वांत मोठा अवयव आहे. त्यामुळे प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम त्वचेवरच होतो, असे संशोधन अहवालात म्हटले आहे.
असे केले संशोधन
२२ ते ४५ वयोगटांतील दहा लोकांवर हे संशोधन करण्यात आले. हे सर्वजण धूम्रपान न करणारे होते. यातील प्रत्येक व्यक्तीस धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचा शर्ट तीन तासांसाठी घालायला देण्यात आला. त्यानंतर त्यांना १५ मिनिटे ट्रेडमिलवर चालविले गेले. घामामुळे प्रदूषण शरीरात लवकर प्रवेश करते. त्यानंतर त्यांचे रक्त व लघवीचे नमुने घेण्यात आले. या लोकांचे डीएनए लिपीड आणि प्रोटिन यांची हानी झाली आहे, असे तपासणीत आढळले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"