सावत्र मुलीची उपासमार; भारतीय महिला दोषी
By Admin | Published: July 31, 2016 05:33 AM2016-07-31T05:33:00+5:302016-07-31T05:33:00+5:30
सावत्र मुलीची दीड वर्षापेक्षा अधिक काळ उपासमार करणाऱ्या भारतीय महिलेला अमेरिकेतील न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
न्यूयॉर्क : सावत्र मुलीची दीड वर्षापेक्षा अधिक काळ उपासमार करणाऱ्या भारतीय महिलेला अमेरिकेतील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मुलीचा छळ केल्याचा आरोपही तिच्यावर असून, तिला २५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
शीतल रनोट (३५) असे या महिलेचे नाव आहे. आपली सावत्र मुलगी माया रनोट हिचा छळ केल्याचा तिच्यावर आरोप आहे. ही घटना २0१४मधील असून, माया तेव्हा १२ वर्षांची होती. शीतल ही मायाला नेहमीच मारहाण करीत असे.
क्विन्स जिल्ह्याचे अॅटर्नी रिचर्ड ब्राऊन यांनी सांगितले की, न्यायाधीशांनी पुरावे आणि पीडित मुलीचा जबाब ग्राह्य धरून शीतल रनोटला दोषी ठरविले आहे. या मुलीला अनेक तासांपर्यंत अन्न-पाणी दिले जात नव्हते.
याप्रकारे तिला मारहाण केल्याच्या अनेक घटना न्यायालयापुढे आल्या. एकदा मारहाणीनंतर वैद्यकीय पथक तिच्या घरी पोहोचले तेव्हा माया रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली होती. या सर्व मारहाणीच्या खुणा मायाच्या अंगावर आजही आहेत. कोणत्याही मुलीस अशी वागणूक दिली जाऊ शकत नाही.
मुलीचा पिता राजेश रनोट याच्यावरही विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याच्यावर नंतर खटला चालविला जाणार आहे. (वृत्तसंस्था)
>क्विन्स सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश रिचर्ड बुचर यांनी दिवसभर विचारविनिमय केल्यानंतर शीतलला दोषी ठरविले. सप्टेंबरमध्ये तिला शिक्षा सुनावण्यात येईल. या प्रकरणी तिला २५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.