पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारावर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 03:40 AM2020-01-04T03:40:11+5:302020-01-04T06:47:06+5:30
भारताकडून तीव्र निषेध
नवी दिल्ली : पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारावर शुक्रवारी संध्याकाळी स्थानिक लोकांनी दगडफेक केल्याच्या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. दगडफेकीमुळे अनेक शीक भाविक गुरुद्वारामध्ये अडकून पडल्याचे समजते. गुरु नानक यांच्या जन्मस्थळी ही गुरुद्वारा बांधण्यात आली आहे. तिचे पावित्र्य कायम राखण्यासाठी पाकिस्तान सरकारने योग्य ती पावले उचलावी असे भारताने म्हटले आहे.
पूर्वी भारतात असलेले हे ठिकाण फाळणीनंतर पाकिस्तानात गेले. नानकाना साहिब गुरुद्वारा प्रमुखाची मुलगी जगजीत कौर हिचे तिच्या घरातून अपहरण करून धर्मांतर करण्यात आल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा वाद धुमसत होता. या मुलीचे अपहरण केल्याचा ज्याच्यावर आरोप आहे त्या मुलाच्या कुटुंबीयांनी संतप्त जमावाचे नेतृत्व केल्याचे समजते. नानकाना साहिब गुरुद्वारावर दगडफेक करणाऱ्यांवर पाकिस्तान सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी भारताने केली आहे. (वृत्तसंस्था)