पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 07:51 AM2024-05-03T07:51:14+5:302024-05-03T07:51:56+5:30
पाकिस्तानमधील हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर केले जात असल्याच्या विरोधात त्या देशातील हिंदू लोकप्रतिनिधी दानेशकुमार पलानी यांनी पाकिस्तानी संसदेत आवाज उठविला.
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर केले जात असल्याच्या विरोधात त्या देशातील हिंदू लोकप्रतिनिधी दानेशकुमार पलानी यांनी पाकिस्तानी संसदेत आवाज उठविला. पलानी यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सिंध प्रांतामध्ये हिंदू मुलींचे धर्मांतर घडविण्यामागे प्रभावशाली व्यक्तींचा हात आहे. हे भीषण प्रकार थांबणे आवश्यक आहे.
दानेशकुमार पलानी यांनी सांगितले की, कोणाचेही बळजबरीने धर्मांतर करण्यास पाकिस्तानची राज्यघटना व कुराण परवानगी देत नाही. हिंदूंच्या मुली ही काही लुटीत मिळविलेली मालमत्ता नाही. या मुलींचे धाकदपटशाने धर्मांतर घडविण्याचा कोणालाही अधिकार नाही. प्रियाकुमारी या मुलीचे अपहरण होऊन दोन वर्षे उलटली आहेत. त्या प्रकरणात हात असलेल्या लोकांवर पाकिस्तान सरकारने अद्याप कारवाई केलेली नाही. कारण ते प्रभावशाली लोक आहेत. काही लोक गैरकृत्ये करत असून त्यामुळे पाकिस्तानची प्रतिमा कलंकित होत आहे. (वृत्तसंस्था)
येथे हिंदू-मुस्लिम एकोप्याने राहतात
पलानी म्हणाले की, पाकिस्तानमधील सिंध प्रांताने बलुचिस्तानकडून धडे घेतले पाहिजेत. बलुचिस्तानमध्ये हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर करण्यात येत नाही. त्या प्रांतात हिंदू-मुस्लिम एकोप्याने राहातात.
पथक आरोपींना वातानुकूलित खोलीत बसवून त्यांची चौकशी करते. बळजबरीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणांचा निष्पक्षपातीपणे तपास करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर एक दिवस पाकिस्तानात हिंदू नावालाही उरणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
धर्मांतर घडविण्यात पाकिस्तानी संसदेतील काही सदस्यांचा हात
बलुचिस्तान आवामी पक्षाचे उमेदवार असलेले दानेशकुमार पलानी अल्पसंख्याकांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून पाकिस्तानी संसदेवर निवडून आले आहेत.
याआधी ते बलुचिस्तानच्या विधानसभेचे सदस्य होते. हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करण्यात काही संसद सदस्यांचा हात आहे असा आरोप दानेशकुमार पलानी यांनी २०२३मध्ये केला होता.
संयुक्त राष्ट्रांनीही व्यक्त केली होती चिंता
पाकमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या मुलींचे धाकदपटशा दाखवून धर्मांतर घडविले जात असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनीही चिंता व्यक्त केली होती.
अल्पसंख्यांक समुदायातील मुलींचे धर्मांतर व त्यांचा लावून देण्यात येणारा विवाह या गोष्टी योग्य असल्याचे निकाल न्यायालयांनी दिले आहेत.
त्याचा परिणाम या पीडित मुलींवर झाला आहे असेही संयुक्त राष्ट्रांनी म्हटले होते.