हे बॉम्बहल्ले थांबवा; पॅलेस्टाइनची संयुक्त राष्ट्रांत धाव, आतापर्यंत ४ प्रस्ताव फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 06:32 AM2023-10-28T06:32:19+5:302023-10-28T06:32:50+5:30
हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी दहशतवादी हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझावर हवाई हल्ले केले, आता जमिनीवरूनही त्या प्रदेशावर हल्ले चढविले जात आहेत.
संयुक्त राष्ट्रे : पॅलेस्टाइनवर इस्रायलने बॉम्बहल्ले करणे बंद करावे अशी मागणी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पॅलेस्टाइनच्या प्रतिनिधीने केली. त्यावर हमास या दहशतवादी संघटनेचा नायनाट झाला पाहिजे. त्यासाठी गाझावर कारवाई सुरू आहे, अशी भूमिका इस्रायलने मांडली.
हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी दहशतवादी हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझावर हवाई हल्ले केले, आता जमिनीवरूनही त्या प्रदेशावर हल्ले चढविले जात आहेत. गाझामध्ये तातडीने शस्त्रसंधी लागू करावी अशी मागणी अरब देशांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये केली होती. गाझातील संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्रांमध्ये आतापर्यंत चार प्रस्ताव विविध कारणांनी फेटाळले गेले आहेत. या संघर्षात इस्रायलची अमेरिकेने पाठराखण केली. मात्र गाझामधील युद्ध अन्य देशांत पसरू नये याची अमेरिका काळजी घेत आहे. हमासच्या दहशतवाद्यांना इराणचा पाठिंबा असल्याचा आरोप अमेरिका व इतर देशांनी केला होता. इराणच्या हालचालींवर पाश्चिमात्य देश बारीक लक्ष ठेवून आहेत.
संघर्षाबाबत इराण, हमासच्या प्रतिनिधींची रशियामध्ये चर्चा
इराणचे परराष्ट्र उपमंत्री अली बगेरी कानी यांनी रशियाची राजधानी मॉस्को येथे हमासचे प्रतिनिधी मूसा अबू मारझौक यांच्याशी भेट घेतली. गाझी पट्टीची नाकाबंदी व शस्त्रसंधी यावर अली कानी यांनी या चर्चेत भर दिला.