हाहाकार! अमेरिकेला वादळाचा तडाखा; ३२ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक लोक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 10:46 IST2025-03-16T10:45:58+5:302025-03-16T10:46:26+5:30
अमेरिकेतील अनेक भागात आलेल्या भीषण वादळात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे मिसूरीमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

हाहाकार! अमेरिकेला वादळाचा तडाखा; ३२ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक लोक जखमी
अमेरिकेतील अनेक भागात आलेल्या भीषण वादळात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे मिसूरीमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार, या वादळात अनेक लोक जखमीही झाले आहेत. अर्कांसस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिपेंडन्स काउंटीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
अर्कांससच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाने एका निवेदनात म्हटलं आहे की, राज्यातील १६ काउंटींमध्ये घरं आणि व्यवसायिक ठिकाणांचं मोठं नुकसान झालं आहे. यासोबतच विजेचे खांब आणि झाडं कोसळण्याच्या अनेक घटनाही नोंदवल्या गेल्या आहेत. टेक्सास पॅनहँडलमधील अमरिलो काउंटीमध्ये धुळीच्या वादळादरम्यान झालेल्या कार अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
मिसूरीमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद
बेकर्सफील्ड परिसरात वादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. मिसूरी, अर्कांसस, टेक्सास आणि ओक्लाहोमा ही राज्य सर्वात जास्त प्रभावित झाली आहेत. मिसूरीमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून तिथे १२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
वादळामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर
जोनास अँडरसन यांनी शनिवारी सकाळी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, अर्कान्सासच्या केव्ह सिटी परिसरात पाच जण जखमी झाले आहेत, जिथे पुढील सूचना मिळेपर्यंत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात १३० हून अधिक आगी लागल्याने ओक्लाहोमाच्या काही समुदायांमधील लोकांना स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.