राजघराण्यातील वादळे... बंड करत प्रिन्स हॅरीने तोडले संबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 07:49 AM2022-09-18T07:49:40+5:302022-09-18T07:51:06+5:30
मुद्द्याची गोष्ट : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांचे नुकतेच वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. राणीपदाच्या 70 वर्षांच्या कारकीर्दीत राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी जितक्या जागतिक घडामोडी पाहिल्या, तितक्याच ब्रिटनच्या राजघराण्यातील उलथापालथींचे, वादांचे चटकेही सोसले.
समीर परांजपे,
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी आपल्या सात दशकांच्या कारकीर्दीत राजघराण्यातील अनेक वादळांना तोंड दिले. त्याची सुरुवात त्यांची धाकटी बहीण मार्गारेटपासून झाली होती. मार्गारेट हिने वायुसेनेतला धडाकेबाज अधिकारी ग्रुप कॅप्टन पीटर टाऊनसेंड याच्याबरोबर विवाह करण्याचे ठरविले होते. मात्र पीटर हे घटस्फोटित होते. ब्रिटनच्या राजघराण्याच्या त्यावेळच्या संकेतांप्रमाणे पीटर यांच्याशी मार्गारेटचा विवाह होणे गैर मानले गेले. त्यामुळे मार्गारेटला हा विवाह रद्द करण्यास भाग पाडण्यात आले. मार्गारेटने नंतर अँथनी आर्मस्ट्राँग-जोन्सशी लग्न केले. त्याने लॉर्ड स्नोडन ही पदवी धारण केली होती. मार्गारेट हिने काही वर्षांच्या संसारानंतर आर्मस्ट्राँग-जोन्सशी घटस्फोट घेतला. ब्रिटिश राजघराण्यात प्रिन्सेस व्हिक्टोरिया मेलिटा हिने आपल्या पतीपासून १९०१ मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर त्या राजघराण्यातील घटस्फोटाचे प्रकरण मार्गारेटमुळे १९७८ मध्ये घ़डले.
जर्मनीतील नातेवाइकांना विवाहाचे निमंत्रण नाही
राणी एलिझाबेथ दुसऱ्या व प्रिन्स फिलिप यांचा विवाह वादग्रस्त ठरला होता. दुसऱ्या महायुद्धात प्रिन्स फिलिप यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या दोन बहिणींनी जर्मन राजघराण्यातील व्यक्तींबरोबर विवाह केले होते. त्यांचे पती नाझी पार्टीत सामील झाले होते. जर्मनीत राहणाऱ्या ब्रिटीश राजघराण्यातील नातेवाईकांना राणी एलिझाबेथ दुसऱ्या व फिलीप यांच्या विवाहाला निमंत्रित करण्यात आले नव्हते. प्रिन्स फिलीप यांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या वावड्याही उठल्या होत्या. प्रिन्स फिलीप यांचे खासगी सचिव माईक पार्कर यांच्या पत्नीने घटस्फोट मागितला म्हणून पार्कर यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. त्यावरून राजघराणे वादात अडकले होते.
प्रिन्स चार्ल्समुळे डोक्याला ताप
राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे वादळ म्हणजे प्रिन्स चार्ल्स व त्यांची पहिली पत्नी डायना यांचे वैवाहिक जीवन. प्रिन्स चार्ल्स यांचे लग्नाआधी कॅमिला पार्कर यांच्याशी प्रेमप्रकरण होते. १९८१ मध्ये प्रिन्स चार्ल्स व डायना यांचा विवाह झाला. त्यांना विलियम व हॅरी ही दोन मुले झाली. प्रिन्स चार्ल्स यांच्या बाहेरख्यालीपणामुळे अस्वस्थ असलेली प्रिन्सेस डायना राजघराण्याची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून काही वर्षे गप्प बसली. परंतु नंतर प्रिन्सेस डायना १९९२ पासून चार्ल्सपासून वेगळी झाली व १९९६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर ३१ ऑगस्ट १९९७ रोजी प्रिन्सेस डायनाचे अपघाती निधन झाले. प्रिन्स चार्ल्स व डायना यांच्या विसंवादात राणी एलिझाबेथ दुसऱ्या आपल्या मुलाचीच बाजू घेतात, असा आरोप झाला होता. या सर्व प्रकरणाचा राणी एलिझाबेथ यांना खूप मनस्ताप झाला. डायनाच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी प्रिन्स चार्ल्स व कॅमिला पार्कर यांनी ९ एप्रिल २००५ मध्ये विवाह केला.
बंड करत हॅरीने तोडले संबंध
प्रिन्स चार्ल्स व डायना यांच्या दोन मुलांपैकी हॅरी हा आईप्रमाणेच बंडखोर निघाला. त्याने २०१८ मध्ये सावळ्या रंगाची अमेरिकी अभिनेत्री मेगन मर्केल हिच्याशी विवाह केला. तिचा वर्ण राजघराण्याला कधीही आवडला नाही. तिला होणारा मुलगा सावळ्या रंगाचा निघाला, तर काय करायचे, अशी भीती राजघराण्यात होती. त्यापायी मेगनला मानसिक त्रासही दिला गेला. सरतेशेवटी मेगन मर्केल व हॅरीने २०२० मध्ये राजघराण्याचा त्याग केला. ब्रिटनचे राजघराणे वंशद्वेषी असल्याचा आरोप हॅरी व मेगन मर्केल यांनी ओप्रा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्याला काही काळ बचावाच्या पवित्र्यात जावे लागले होते. राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या निधनानंतर राजे चार्ल्स तिसरे यांनी केलेल्या दूरध्वनीनुसार प्रिन्स विलियम यांनी भाऊ प्रिन्स हॅरी व त्याची पत्नी मेगन मर्केल यांना अंत्यदर्शनासाठी ब्रिटनला बोलावून घेतले होते.
(लेखक लोकतमध्ये मुख्य उपसंपादक आहेत)