कहाणी एका बापाची ! दोन वर्ष भीक मागून मुलीसाठी खरेदी केला नवा ड्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2017 12:02 PM2017-04-08T12:02:25+5:302017-04-08T12:04:22+5:30
दोन वर्ष भीक मागून त्याने पैसे जमवले आणि मुलीला तिच्या आयुष्यातील सर्वात महागडं गिफ्ट दिलं. कहाणी एका जिद्दी बापाची आणि त्याच्या मुलीची
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - रस्त्यावर एखादा भिकारी दिसला तर त्याच्याकडे तुच्छ नजरेने पाहून यांना काम करता येता नाही का ? असं म्हणणारे अनेकजण असतात. पण सर्वांप्रमाणे त्यांच्याही आयुष्यात काहीतरी समस्या असतात, ज्यामुळे भीक मागण्याची ही वेळ त्यांच्यावर आलेली असते. एरव्ही फोटो, चित्रपट पाहून डोळ्यात पाणी आणून हळहळ व्यक्त करणारे आपण कितीवेळा त्यांच्या भावना जाणून घेण्याच्या प्रयत्न करतो. कदाचित कधीच नाही. समोरच्या भिका-याला चल पुढे निघ, वेळ नाही सांगत आपल्या भावनांचं प्रदर्शन करणा-यांना सध्या एका फोटोने विचलित केलं आहे. फोटोग्राफर जीएमबी आकाश यांनी फेसबूकवर फोटोसहित शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी एक भिकारी आणि त्याच्या मुलीच्या आयुष्यातील खास क्षण कॅमे-यात टिपला आहे. या फोटोत इतकं काय खास आहे असं म्हणत असाल तर त्यामागची गोष्ट समजून घेणं तुमच्यासाठी तितकंच गरजेचं आहे.
ही गोष्ट आहे कौसर हुसेन आणि त्यांच्या मुलीची. कौसर हुसेन यांना एका अपघातात आपला उजवा हात गमवावा लागला. हात गमावल्याने त्यांना कोणीही काम देण्यास तयार होईना. शेवटी परिस्थितीसमोर झुकलेल्या कौसरने कुटंबाचं पोट भरण्यासाठी भीख मागण्यास सुरुवात केली. एके दिवशी आपल्या मुलीला ड्रेस खरेदी करण्यासाठी दुकानात गेले असता दुकानदाराने त्यांचा यथेच्छ अपमान करत त्यांना बाहेर हाकलून काढलं. आपल्या वडिलांचा झालेला अपमान पाहून त्या चिमुरडीचेही डोळे ओले झाले. आपल्याला नवीन ड्रेस नको म्हणत आपल्या वडिलांचा हात धरुन त्यांना ती बाहेर घेऊन गेली.
या घटनेला दोन वर्ष पुर्ण झाल्यानंतर हुसेनने आपल्या मुलीसाठी पिवळ्या रंगाचा फ्रॉक खरेदी केला. आपल्याला नवीन फ्रॉक मिळाल्याचं पाहून त्यांची मुलगीही आनंदाने उड्या मारायला लागली होती. फोटोग्राफर जीएमबी आकाशने त्यांच्या आयुष्यातील फार कमी वेळा येणा-या आनंदाच्या या क्षणाला कॅमे-यात टिपलं. त्यांच्या आयुष्यातील या खडतर प्रवासाची गोष्ट सांगत आकाशने हा फोटो फेसबूकवर शेअर केला. 5 एप्रिल रोजी शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत 54 हजार जणांनी लाईक केलं असून तब्बल 15 हजार जणांनी शेअर केलं आहे. आपल्या मुलीला नवीन फ्रॉक विकत घेण्यासाठी हुसेन यांनी भीक मागून पैसे जमा केले. सलग दोन वर्ष त्यांनी पैसे साठवले आणि आपल्या मुलीला तिच्या आयुष्यातील सर्वात महागडी भेट दिली.
आकाश यांनी फेसबूकवर पोस्ट लिहिली आहे. ज्यामधून हुसेन यांचा आयुष्यपट उलगडत जातो. त्यांच्याच पोस्टमधून जाणून घेऊया या बापाची कहाणी -
काल माझ्या मुलीसाठी दोन वर्षांनी नवीन ड्रेस खरेदी करु शकलो. दोन वर्षांपुर्वी जेव्हा मी दुकानदाराला पाच रुपयांच्या 60 नोटा दिल्या होत्या तेव्हा त्याने संतापून मी भिकारी आहे का ? असं मला विचारलं होतं. हे सर्व पाहून माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. हात पकडून ती मला दुकानाबाहेर घेऊन गेली. माझा झालेला अपमान तिला पहावला नाही. मला कोणताच ड्रेस नको सांगताना ती रडत होती. मी माझ्या असलेल्या एका हाताने तिचे डोळे पुसत होतो.
हो मी भिकारी आहे. आजपासून 10 वर्षांपूर्वी मला भीक मागून आपलं पोट भरावं लागेल याचा साधा विचारही मी केला नव्हता. पुलावरुन पडल्यावर मी मरता मरता वाचलो होतो. मी जिवंत राहिलो, पण अपंग झालो होतो. तुमचा दुसरा हात कुठे गेला असं सारखं माझा मुलगा मला विचारत असतो. माझी मुलगी तिच्या हाताने मला जेवण भरवते. एक हात नसताना किती त्रास होतो याची तिला जाणीव असल्याचं ती सांगत असते.
दोन वर्षांनी आज माझ्या मुलीने नवा ड्रेस घातला आहे. म्हणूनच आज मी तिला माझ्यासोबत खेळण्यासाठी बाहेर घेऊन आलो आहे. आज मी एक पैसाही कमावणार नाही, पण मला माझ्या मुलीसोबत वेळ घालवायचा आहे. माझ्या पत्नीला न सांगता मी शेजा-याचा फोन मागून आणला आहे. माझ्याकडे माझ्या मुलीचा एकही फोटो नाही. तिच्या आयुष्यातील हा क्षण तिच्या कायम आठवणीत राहावा असं मला वाटतं. ज्यादिवशी माझ्याकडे फोन येईल त्यादिवशी माझ्या मुलांचे खूप सारे फोटो काढेन. मला सर्व चांगल्या आठवणी गोळा करुन ठेवायच्या आहेत. मुलांना शाळेत शिकवण्यासाठी पाठवणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. तरीही मी त्यांनी शिकवत आहे. शाळेची फी भरायला पैसे नसल्याने अनेकदा त्यांना परिक्षेला बसू दिलं जात नाही. अशावेळी माझी मुलं खूप उदास होतात. अशावेळी त्यांना हिंमत देण्यासाठी मी नेहमी सांगत असतो की, आयुष्य आपली खूप मोठी परिक्षा घेत असतो, त्यामुळे अशा परिक्षा कधी कधी सोडाव्या लागतात.
आता मी भीक मागायला जात आहे. मी आपल्या मुलीलाही सोबत सिग्नलावर घेऊन जाणार आहे. त्या सिग्नलवर ती माझी वाट पाहत बसेल. भीक मागताना मी काही अंतरावरुन तिच्याकडे पाहत असेन. जेव्हा मी भीक मागण्यासाठी लोकांसमोर हात पसरवतो तेव्हा तिने पाहिलं तर मला खूप लाज वाटते. रस्त्यावर मोठमोठ्या गाड्या असल्याने ती मला एकट्याला सोडत नाही. पुन्हा एकदा माझा अपघात होईल याची तिला भीती वाटत असते. एखादी गाडी माझ्या अंगावरुन जाईल आणि माझा मृत्यू होईल याची तिला भीती वाटते.
जेव्हा कधी मी थोडे पैसे जमा करतो, तेव्हा मुलीचा हात पकडून घरी जातो. आम्ही आपल्या खिशाला परवडेल त्याप्रमाणे खरेदी करतो. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आम्ही दोघेही भिजतो. पावसात भिजणं आम्हा दोघांनाही खूप आवडतं. ज्यादिवशी मला मोकळ्या हाताने घरी परतावं लागतं, तेव्हा आम्ही शांतपणे घरी येतो. अशावेळी आपण मेलो का नाही असं वाटत राहतं. पण जेव्हा रात्री माझी मुलं झोपेत मिठी मारतात तेव्हा जगणं इतकंही वाईट नाही असं राहून राहून वाटतं. जेव्हा माझी मुलगी सिग्नलवर डोकं खाली करुन माझी वाट पाहत असते तेव्हा मला खूप वाईट वाटतं. भीक मागताना तिच्याशी नजरही मिळत नाही. पण आजचा दिवस वेगळा आहे. आज माझी मुलगी खूप आनंदी आहे. आज हा बाप फक्त एक भिकारी नाही. आज मी एक राजा आणि ती माझी राजकुमारी आहे.