अजबच! बँकेत झाली चोरी, अधिकाऱ्यांनी आपला पगार कापून केली भरपाई, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 21:55 IST2025-01-16T21:54:43+5:302025-01-16T21:55:12+5:30
Banking News: बँकेत ठेवलेल्या ठेवी, वस्तू ह्या सुरक्षित असतात, असं मानलं जातं. मात्र मागच्या काही काळापासून जगभरातील बँकांच्या लॉकरमधून चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

अजबच! बँकेत झाली चोरी, अधिकाऱ्यांनी आपला पगार कापून केली भरपाई, कारण काय?
बँकेत ठेवलेल्या ठेवी, वस्तू ह्या सुरक्षित असतात, असं मानलं जातं. मात्र मागच्या काही काळापासून जगभरातील बँकांच्या लॉकरमधून चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना जपानमध्ये घडली आहे. येथे एका बँकेच्या लॉकरमधून ग्राहकाचे सुमारे १.४ अब्ज येन चोरल्याच्या आरोपाखाली तेथील कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र अटकेनंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्राहकांची माफी मागून आपल्या वेतनामधून नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, जपानमधील मुख्य बँकेपैकी एक असलेल्या एमयूएफजी बँकेच्या दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये चोरीच्या घटना चार वर्षांपासून सुरू होत्या. मात्र मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला. बँकेने दिलेल्या माहितीनुसार बरखास्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही बँकांच्या शाखांमधील सुमारे ६० लॉकरमधून १.४ अब्ज येन किमतीचं सोनं, रोख रक्कम आणि काही मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या.
बँकेत अफरातफर करणाऱ्या या कर्मचाऱ्याची ओळख युकारी उवामुरा अशी पटली आहे. त्याला यामाजाकी या नावानेही ओळखलं जातं. त्याला दोन ग्राहकांच्या लॉकरमधून वेगवेगळ्या वेळी सोन्याच्या २० छड्या चोरल्याच्या संशयाखाली मंगळवारी अटक करण्यात आली होती.
दरम्यान, पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. बँकेच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये चेअरमन नाओकी होरी, मुख्य कार्यकारी जुनिची हनजावा आणि व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी तादाशी यामामोटो यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांपैकी प्रत्येकाच्या वेतनामधून तीन महिन्यांमध्ये ३० टक्के कपात केली जाईल.
याशिवाय इतर दोन अधिकाऱ्यांच्या वेतनामध्ये तीन महिन्यांमध्ये २० टक्क्यांची कपात केली जाईल. बँकांनी आपल्या वक्तव्यामध्ये सांगितले की, ग्राहक आणि हितचिंतकांमध्ये होणाऱ्या असुविधेसाठी आम्ही माफी मागतो.