रॉकेट प्रक्षेपणाने तणाव वाढला
By admin | Published: February 9, 2016 03:55 AM2016-02-09T03:55:20+5:302016-02-09T03:55:20+5:30
उत्तर कोरियाने रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केल्याचा दावा केल्यानंतर उत्तर-पूर्व आशियातील तणाव वाढला आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिका स्व संरक्षणासाठी एक मिसाईलप्रणाली
सेऊल : उत्तर कोरियाने रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केल्याचा दावा केल्यानंतर उत्तर-पूर्व आशियातील तणाव वाढला आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिका स्व संरक्षणासाठी एक मिसाईलप्रणाली उभारण्याच्या विचारात आहे. याला चीन आणि रशिया यांचा विरोध आहे.
मागील महिन्यातील हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीनंतर उत्तर कोरियाने रविवारी यशस्वी रॉकेट प्रक्षेपण केले. त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटू लागले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने तातडीची बैठक घेऊन उत्तर कोरियाच्या या कृतीचा निषेध केला आहे. तथापि, उत्तर कोरियावरील निर्बंध आणखी कडक करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या बैैठकीत असे मत मांडण्यात आले की, उत्तर कोरियाच्या या प्रक्षेपणाकडे जरी रॉकेट प्रक्षेपण अथवा अंतराळ यान म्हणून पाहिले तरीही ही कृती अण्वस्त्र विकासात योगदान देत असल्याचे दिसून येते. उत्तर कोरियाचे हे रॉकेट प्रक्षेपण म्हणजे गंभीर धोका आहे, अशी भीती यावेळी अमेरिकेने व्यक्त केली आहे. चीन आणि रशियाने मात्र या परिस्थितीवर तोडगा काढण्याची भूमिका मांडली. तथापि, उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय समुदायाचे मत विचारात न घेता ही कृती केल्याचे मतही चीनने व्यक्त केले आहे.
दक्षिण कोरियाचे विदेश मंत्री यून बाययूंग सी म्हणाले की, सद्य परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आम्ही कदाचित अमेरिकेचा दौरा करू. (वृत्तसंस्था)