अमेरिकेचे लखवीविरोधात सबळ पुरावे
By admin | Published: March 18, 2015 12:18 AM2015-03-18T00:18:44+5:302015-03-18T00:18:44+5:30
२००८ च्या मुंबई बॉम्बस्फोटात पाक दहशतवादी झकी-उर-लखवी याचा हात असल्याचे सबळ पुरावे अमेरिकेने पाकिस्तानला दिले आहेत.
वॉशिंग्टन : २००८ च्या मुंबई बॉम्बस्फोटात पाक दहशतवादी झकी-उर-लखवी याचा हात असल्याचे सबळ पुरावे अमेरिकेने पाकिस्तानला दिले आहेत. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा करण्याच्या वचनाची आठवण याआधी अमेरिकेने पाकिस्तानला करून दिली असून, त्यानंतर हे पुरावे दिले आहेत.
अमेरिकेने पाकला लखवीविरुद्ध सबळ पुरावे दिले आहेत, असे एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. पण हे प्रकरण कायद्याच्या कक्षेत असल्याने त्याने यासंदर्भात काही तपशील दिले नाहीत. अमेरिकेने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात लष्कर-ए- तोईबाचा हस्तक लखवी व इतरांविरोधात पाकला विश्वासार्ह पुरावे दिले आहेत, असे त्याने सांगितले. मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याच्या चौकशीतून अमेरिकेला ही माहिती मिळाली आहे. मुंबई हल्ल्याप्रकरणी डेव्हिड हेडली आता अमेरिकेत शिक्षा भोगत आहे. अमेरिकेतील अनेक सुरक्षा संस्था व गुप्तचर संघटनांनी मुंबई दहशतवादी हल्ल्याची स्वतंत्र चौकशी केली आहे. अमेरिकेने पाकशी दहशतवादविरोधी सहकार्य करण्याचा करार केला असून त्याअंतर्गत कारवाई करण्याचे, तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपींना शासन करण्याची आठवण करून दिली आहे. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांना तसेच आर्थिक मदत करणाऱ्यांना पाकने कायद्याच्या कक्षेत आणण्याचे आश्वासन अमेरिकेला दिले आहे. (वृत्तसंस्था)
इस्लामाबाद- पाकिस्तानात दहशतवाद व हत्येचा आरोप असणाऱ्या १२ कैद्यांना एकाच दिवशी फाशी देण्यात आली असून, फाशीच्या शिक्षेवरील सहा वर्षांची बंदी उठल्यानंतर एकाच दिवशी जास्त संख्येने फाशी देण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.
झांग, कराची, लाहोर, रावळपिंडी, मुलतान, मियावाली, फैसलाबाद, गुरानवाला या तुरुंगात या कैद्यांना फासावर चढविण्यात आले. १७ डिसेंबर रोजी फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवल्यापासून आतापर्यंत फाशी दिलेल्या कैद्यांची संख्या ३९ झाली आहे.
पाकिस्तानात पेशावर येथील लष्करी शाळेवर तालिबानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात १३२ शाळकरी मुलांसह १५० जणांचा मृत्यू झाल्यानंतर पाक सरकारने १७ डिसेंबर रोजी फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवली आहे.
४पाकिस्तानात गुन्हेगारी आरोपींना जबरदस्तीने आरोप कबूल करावे लागत असल्याने फाशी अन्याय्य असल्याचे मानवी हक्क संघटनांचे म्हणणे आहे. दरम्यान, पाकिस्तानात एका आरोपीची फाशीची शिक्षा ऐनवेळी लांबणीवर टाकण्यात आली. आरोपीच्या नातेवाईकांनी अखेरच्या क्षणी आरोपी व दावेदार यांच्यातील कराराचे कागदपत्र तुरुंग अधिकाऱ्यांसमोर सादर केले.