श्रीलंकेत खदखद कायम; मंत्रिमंडळाचा राजीनामा, सरकारमध्ये सहभागी होण्याचे अध्यक्षांचे आमंत्रण विरोधी पक्षांनी साफ धुडकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 08:36 AM2022-04-05T08:36:59+5:302022-04-05T08:37:19+5:30
Sri Lanka News: अर्थव्यवस्थेच्या हाताळणीत सपशेल अपयशी ठरलेल्या महिंदा राजपक्षे यांच्या सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने रविवारी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली.
कोलम्बो : अर्थव्यवस्थेच्या हाताळणीत सपशेल अपयशी ठरलेल्या महिंदा राजपक्षे यांच्या सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने रविवारी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली. यातून मार्ग काढण्यासाठी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी विरोधी पक्षांना सरकारात सामील होण्याचे आमंत्रण दिले. मात्र, सरसकट सर्व विरोधकांनी अध्यक्षांचे हे आमंत्रण धुडकावून लावले. दरम्यान, आणीबाणीमुळे देशात निर्माण झालेली खदखद कायम आहे.
पंतप्रधान राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आर्थिक धोरणांची नीट हाताळणी करता न आल्याने श्रीलंकेत अभूतपूर्व स्थिती आल्याने तेथे आणीबाणी जारी करण्यात आली. शनिवारी सायंकाळी संचारबंदीही लागू करण्यात आली. मात्र, तरीही देशभरात सरकारविरोधात निदर्शने सुरू राहिली. रविवारी रात्री मंत्रिमंडळातील सर्व २६ मंत्र्यांनी आपला राजीनामा सोपवला. मात्र, पंतप्रधान राजपक्षे यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे अध्यक्षांनी चार जणांकडे महत्त्वाची खाती सोपवली आहेत. कारभार सुधारण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत सरकार स्थापन करावे, असे आवाहन अध्यक्षांनी केले. मात्र, त्यास विरोधकांनी नकार दर्शवला. या संकटांना राजपक्षे परिवार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. (वृत्तसंस्था)
शेअर बाजाराचे सर्व व्यवहार ठप्प
श्रीलंकेतील शेअर बाजार सोमवारी सकाळी उघडल्यानंतर काही सेकंदातच तिथले सर्व व्यवहार ठप्प झाले. मंत्रिमंडळातील सर्वच सदस्यांनी राजीनामा दिल्याच्या घडामोडीचा परिणाम होऊन शेअर बाजाराचा निर्देशांक ५.९ टक्क्यांनी घसरला. आर्थिक संकटाचाही मोठा तडाखा श्रीलंका शेअर बाजाराला बसला.