मोबाइलवरील गेमने विद्यार्थ्याचा मृत्यू?; ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ कारणीभूत असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 06:41 AM2024-04-24T06:41:23+5:302024-04-24T06:41:57+5:30
मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातील २० वर्षीय प्रथम वर्षाचा विद्यार्थी ८ मार्च रोजी मृतावस्थेत आढळला होता
वॉशिंग्टन : अमेरिकेत गेम खेळत असताना एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मार्च महिन्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या विद्यार्थ्याच्या मृत्यूमागे ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ हा ऑनलाइन गेम कारणीभूत असल्याचा संशय आहे. या खेळाला ‘सुसाइड गेम’ असेही म्हणतात.
मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातील २० वर्षीय प्रथम वर्षाचा विद्यार्थी ८ मार्च रोजी मृतावस्थेत आढळला होता. ब्रिस्टल काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नीचे प्रवक्ते ग्रेग मिलियोट म्हणाले की, आत्महत्या केली असावी असा विचार करून तपास केला जात आहे.
आत्महत्येसाठी प्रवृत्त
भारत सरकारला ‘ब्लू व्हेल चॅलेंज’वर बंदी आणायची होती, परंतु त्याऐवजी मार्गदर्शक सूचना जारी करत हा विषय सोडून दिला होता. आयटी मंत्रालयाने २०१७ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ब्लू व्हेल गेम आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यामुळे त्यापासून दूर राहा.
श्वास रोखून धरला
सुरुवातीला विद्यार्थ्याची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून दिल्याचे बोलले जात होते. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे नेमके कारण पोलिसांनी अद्याप समोर आणलेले नाही. दोन मिनिटे विद्यार्थ्याचा श्वास रोखला होता. यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
काय असते गेममध्ये?
‘ब्लू व्हेल चॅलेंज’ हा एक ऑनलाइन गेम आहे, ज्यामध्ये खेळाडूला काहीतरी करण्याचे आव्हान दिले जाते. या गेममध्ये ५० स्तर आहेत, जे अधिकाधिक कठीण होत जातात. या प्रकरणी पोलिस म्हणाले की, आम्ही विद्यार्थ्याच्या अंतिम वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहोत. त्यानंतरच विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत काही सांगता येणार आहे.