विद्यार्थ्यांनी अशक्य ते शक्य केले; बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 09:14 AM2024-08-08T09:14:52+5:302024-08-08T09:15:22+5:30
संताप, सुडाद्वारे नव्हे, तर शांतता, प्रेमाद्वारे देश उभारणार; कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू
ढाका : बांगलादेशातील शूर मुलांच्या प्रयत्नांमुळे आपला देश मुक्त झाला आहे, असे उद्गार माजी पंतप्रधान व बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख खालिदा झिया यांनी बुधवारी काढले. त्यांची कारावासातून मंगळवारी सुटका करण्यात आली होती. अशक्य ते शक्य करून दाखविल्याबद्दल बांगलादेशच्या जनतेचे मी अभिनंदन करते. संताप, सूडाद्वारे नव्हे, तर शांतता, प्रेम यांच्या माध्यमातूनच बांगलादेशची पुनर्उभारणी करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
२०१८ नंतर त्यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बुधवारी केलेल्या भाषणात खालिदा झिया यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, कारावासातून माझी सुटका व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांचे मी आभार मानते. बांगलादेश भ्रष्टाचार, गलिच्छ राजकारण या गोष्टींनी वेढला गेला आहे. त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करूया.