भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीचा विषय पाकिस्तान नेणार आंतरराष्ट्रीय पातळीवर
By admin | Published: May 16, 2016 01:03 PM2016-05-16T13:03:21+5:302016-05-16T13:03:21+5:30
भारताने केलेल्या सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्र चाचणीचा विषय पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १६ - भारताने केलेल्या सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्र चाचणीचा विषय पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझिझ यांनी सोमवारी ही माहिती दिली.
भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीवर अझीझ यांनी चिंता व्यक्त केली. अशा चाचण्यांमुळे क्षेत्रीय संतुलन बिघडते असे त्यांनी सांगितले. भारताच्या चाचणीवर आक्षेप घेणा-या अझीझ यांनी मात्र पाकिस्तान संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवत राहील असे सांगितले.
अमेरिकेबरोबर दृढ झालेले भारताचे संबंधही पाकिस्तानला खुपत आहेत. भारताला अमेरिकेकडून सहकार्य मिळत आहे. चीनला रोखण्यासाठी सशक्त भारत आवश्यक आहे असे अमेरिकेला वाटते असे अझीझ म्हणाले. आम्ही हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करु असे त्यांनी सांगितले. भारताने रविवारी ओदिशाच्या तटावर स्वदेशी बनावटीच्या सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी केली.