प्रेरणादायी! 2013 मध्ये नोकरी गमावली पण 'तिने' हार नाही मानली; आता महिन्याला कमावते 8 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 02:35 PM2022-10-27T14:35:31+5:302022-10-27T14:43:38+5:30
जेनिस टोरेस या महिलेने अशीच प्रेरणादायी कामगिरी केली आहे. 2013 मध्ये तिची नोकरी गेली.
प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. काहींना नोकरी गमवावी लागते. पण यातही काही जण हार मानत नाहीत. परिस्थितीला तोंड देत जिद्दीने लढतात. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. अमेरिकेतील इंजिनिअर जेनिस टोरेस या महिलेने अशीच प्रेरणादायी कामगिरी केली आहे. 2013 मध्ये तिची नोकरी गेली. या वेळी तिला महिन्याला पगार 5.5 लाख रुपये होता. म्हणजेच, नोकरीतून तिला वर्षाला तब्बल 66 लाख रुपये मिळत होते. त्यामुळेच 2013 मध्ये जेव्हा त्यांची नोकरी गेली, तेव्हा तिला मोठा धक्काच बसला.
नोकरी गेल्यानंतर घर कसं चालवायचं हा प्रश्न उभा राहिला. मात्र, याचवेळी टोरेस यांनी मनाशी पक्का निश्चिय केला की, आता असे काही काम करू जेणेकरुन उत्पन्नाचा स्रोत कायमस्वरुपी सुरू राहील. नोकरी असो वा नसो, पण स्वतःच्या रोजच्या खर्चाचं टेन्शन राहणार नाही. नोकरीच्या काळात तिने ‘डेलिश डी लाइट्स’ नावाने एक फूड ब्लॉग सुरू केला होता. पण तेव्हा हा ब्लॉग कमाईचं साधन नव्हतं तर एक छंद होता. नोकरी गेल्यानंतर टोरेसने या ब्लॉगकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.
सीएनबीसीच्या ‘मेक इट हॅपन’ कार्यक्रमात बोलताना टोरेसने 2015 पर्यंत हळूहळू हा फूड ब्लॉग इतका लोकप्रिय झाला की त्याची महिन्याला वाचक संख्या 15,000 पर्यंत पोहोचली असं म्हटलं आहे. त्यानंतर मी यो क्वेरो डिनेरो हे मनी पॉडकास्ट सुरू केलं. या पॉडकास्टद्वारे, मी माझा अनुभव शेअर करते आणि लोकांना पैसे कसे कमवायचे ते शिकवते असंही सांगितलं. टोरेसने ब्लॉग लिहायला सुरुवात केली, व यासोबतच त्या फ्रीलान्सर म्हणून विविध कामं करत गेली. त्यामुळे तिच्या उत्पन्नात भर पडत गेली.
टोरेसने माझ्या सर्व कामांतून मिळणारं उत्पन्न एकत्र केल्यास ते दरमहा सरासरी 35,000 डॉलर म्हणजेच 28,96,549 रुपये आहे. यामध्ये मुख्य काम वगळता इतर कामांतून मिळणारं उत्पन्न हे 8,27,292 रुपये आहे.’ याचाच अर्थ टोरेस यांना त्यांच्या साईड बिझनेसमधून दर महिन्याला 8 लाखांहून अधिक उत्पन्न मिळतं. एखाद्या कारणास्तव तुमची नोकरी गेली, तर तुम्ही साइड बिझनेस करा असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"