एलम मस्कने टेस्लाच्या रेड कारने केली जगातल्या शक्तिशाली रॉकेटची चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 11:30 AM2018-02-07T11:30:55+5:302018-02-07T14:37:35+5:30
जगातील शक्तिशाली रॉकेट 'फाल्कन हेवी' चे मंगळवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या खासगी कंपनीने फाल्कन हेवी रॉकेटची निर्मिती केली आहे.
केप कॅनाव्हेरल - जगातील शक्तिशाली रॉकेट 'फाल्कन हेवी' चे मंगळवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या खासगी कंपनीने फाल्कन हेवी रॉकेटची निर्मिती केली आहे. फ्लोरिडातील केनडी स्पेस सेंटर तळावरुन हे रॉकेट अवकाशात झेपावले. फाल्कन हेवीची पहिली चाचणी यशस्वी ठरली आहे. याच फ्लोरिडातील तळावरुन नासाच्या चंद्र मोहिमेला सुरुवात झाली होती.
या 23 मजली जंबो रॉकेटमध्ये पेलोड म्हणून टेस्लाची लाल रंगाची कार ठेवण्यात आली होती. हे रॉकेट यशस्वीरित्या अवकाशात झेपावताच कॅलिफोर्नियातील हॉर्थोन इथल्या स्पेस एक्सच्या मुख्यालयात कर्मचा-यांनी एकच जल्लोष केला. या शक्तीशाली रॉकेटचे उड्डाण पाहण्यासाठी अवकाश तळापासून आठ किलोमीटर अंतरावर कोको बीच येथे शेकडो लोक जमले होते.
फाल्कन रॉकेटचे वजन 63.8 टन आहे. दोन अवकाश यानांइतके हे वजन आहे. 230 फूट लांबीच्या या यानात 27 मर्लिन इंजिन बसवण्यात आले आहे. रॉकेट झेपावल्यानंतर बरोबर तीन मिनिटांनी रॉकेटच्या मध्य भागातून दोन बूस्टर स्वतंत्र होतील. तीच सर्वात कठिण प्रक्रिया असेल असे मस्कने आधीच सांगितले होते. उड्डाणानंतर आठ मिनिटांनी विलग झालेले दोन बूस्टर पृथ्वीच्या कक्षेत परततील आणि केप कॅनाव्हेरलच्या एअर फोर्स स्टेशनच्या तळावर उतरले. मधल्या बूस्टरचे समुद्रात ड्रोन शीपवर लँडिंग होईल. येत्या काही वर्षात स्पेस एक्सची मंगळ मोहिमेची योजना आहे.