सुदानमध्ये परिस्थिती बिघडली; तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'ला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 05:41 PM2023-04-24T17:41:05+5:302023-04-24T17:42:33+5:30
आफ्रिकन देश सुदानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे.
Sudan Civil War: आफ्रिकन देश सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू आहे. संकटग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन कावेरी' सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. 'ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 500 भारतीय सुदानच्या बंदरांवर पोहोचले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी जहाजे आणि विमाने सज्ज आहेत. आम्ही सुदानमधील आमच्या सर्व बांधवांना मदत करण्यास वचनबद्ध आहोत,' असे ट्विट त्यांनी केले..
Operation Kaveri gets underway to bring back our citizens stranded in Sudan.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) April 24, 2023
About 500 Indians have reached Port Sudan. More on their way.
Our ships and aircraft are set to bring them back home.
Committed to assist all our bretheren in Sudan. pic.twitter.com/8EOoDfhlbZ
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हवाई दलाची दोन सी-130 विमाने आणि नौदलाचे आयएनएस सुमेधा जहाज सौदी अरेबिया आणि सुदानला पोहोचले आहेत. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे हवाई दलाची जहाजे तैनात आहेत, तर आयएनएस सुमेधा सुदानच्या बंदरात पोहोचली आहे.
सुदानमध्ये काय सुरू आहे?
सुदानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. लष्कराविरुद्ध युद्ध करणाऱ्या निमलष्करी दलाला येथे रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) म्हणून ओळखले जाते. लष्कर आणि आरएसएफ यांच्यात सुरू झालेल्या युद्धात येथील सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. राजधानी खार्तूममध्ये सर्वात वाईट परिस्थिती आहे. विमानतळ, स्थानकासह सर्व महत्त्वाच्या जागा ताब्यात घेण्यासाठी लढा सुरू आहे.
भारतीयांना बाहेर काढणे का कठीण?
सुदानमध्ये सुमारे 4 हजार भारतीय आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश भारतीय चार शहरांमध्ये स्थायिक आहेत. यापैकी एक ओमदुरमन, दुसरा कसाला, तिसरा गेदारेफ किंवा अल कादरिफ, तर चौथ्या शहराचे नाव वड मदनी आहे. यापैकी दोन शहरांचे अंतर राजधानी खार्तूमपासून 400 किलोमीटरपेक्षा जास्त आहे, तर एका शहराचे अंतर सुमारे 200 किलोमीटर आहे.
एक शहर राजधानीला लागून आहे आणि खार्तूमपासून त्याचे अंतर फक्त 25 किमी आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे या चार शहरांपैकी एकाही शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही. सुदानमध्ये फक्त दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. एक राजधानी खार्तूममध्ये आहे आणि दुसरे पोर्ट सुदानमध्ये आहे. मात्र, हवाई हल्ल्याच्या वेळी इथून लोकांना बाहेर काढणेही अवघड आहे. त्यामुळे सध्या जहाजांची मदत घेतली जात आहे.
सुदानमध्ये युद्ध का सुरू आहे?
आफ्रिकन देश सुदानमध्ये लष्कराचे कमांडर जनरल अब्देल-फताह बुरहान आणि निमलष्करी दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान डगालो यांच्यात संघर्ष सुरू आहे. जनरल बुरहान आणि जनरल डगालो हे दोघेही आधी एकत्र होते. सध्याच्या संघर्षाची मुळे एप्रिल 2019 मध्ये जातात. त्यावेळी सुदानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओमर अल-बशीर यांच्याविरोधात जनतेने उठाव केला होता. नंतर लष्कराने अल-बशीरची सत्ता उलथून टाकली. बशीर यांना सत्तेवरून हटवल्यानंतरही बंडखोरी थांबली नाही. नंतर लष्कर आणि आंदोलकांमध्ये सामंजस्य करार झाला. करारानुसार, एक सार्वभौमत्व परिषद स्थापन करण्यात आली आणि 2023 च्या अखेरीस निवडणुका होतील असा निर्णय घेण्यात आला. त्याच वर्षी अब्दल्ला हमडोक यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र हेही कामी आले नाही. ऑक्टोबर 2021 मध्ये लष्कराने सत्तापालट केला. जनरल बुरहान परिषदेचे अध्यक्ष आणि जनरल डगालो उपाध्यक्ष झाले.
युद्ध कशासाठी झाले?
जनरल बुरहान आणि जनरल डगालो एकेकाळी एकत्र होते, पण आता दोघेही एकमेकांच्या विरोधात गेले आहेत. याचे कारण म्हणजे दोघांमधली दुरावा. वृत्तसंस्थेनुसार, सुदानमध्ये निवडणुका घेण्याबाबत दोघांमध्ये एकमत होऊ शकले नाही. याशिवाय असे देखील बोलले जात आहे की, लष्कराने एक प्रस्ताव ठेवला होता, ज्या अंतर्गत 10,000 आरएसएफ सैनिकांना सैन्यात सामील करण्याची चर्चा होती. पण त्यानंतर निमलष्करी दलाचे लष्करात विलीनीकरण झाल्यानंतर तयार होणाऱ्या नव्या दलाचे प्रमुख कोण असेल, असा प्रश्न निर्माण झाला. गेल्या काही आठवड्यांपासून देशाच्या विविध भागांमध्ये निमलष्करी दलांची तैनाती वाढली होती, याला लष्कराने चिथावणीखोर आणि धमकी म्हणून पाहिले होते. यानंतर गृहयुद्ध सुरू झाले.