असाद-पुतीन यांची अचानक भेट

By admin | Published: October 22, 2015 03:57 AM2015-10-22T03:57:47+5:302015-10-22T03:57:47+5:30

बंडखोरांशी गेली चार वर्षे लढणारे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांनी अचानक रशियाला भेट देऊन संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. मॉस्कोमध्ये जाऊन क्रेमलिनमध्ये

Sudden Visit to Asad-Putin | असाद-पुतीन यांची अचानक भेट

असाद-पुतीन यांची अचानक भेट

Next

मॉस्को : बंडखोरांशी गेली चार वर्षे लढणारे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांनी अचानक रशियाला भेट देऊन संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. मॉस्कोमध्ये जाऊन क्रेमलिनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी त्यांनी चर्चाही केली. असाद यांनी २०११ नंतर केलेला हा पहिलाच परदेश दौरा आहे.
रशियाची राजधानी मॉस्को येथे झालेल्या चर्चेमध्ये असाद आणि पुतीन यांच्यासह रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जे लॅव्रोव, संरक्षणमंत्री सर्जे शोयगू यांनीसुद्धा सहभाग घेतला. ३० सप्टेंबर पासून लढण्यासाठी मदत करत असणाऱ्या रशियाला आणि रशियन नेत्यांना आपण धन्यवाद देत आहोत असे वक्तव्य असाद यांनी यावेळेस केले.
सीरियामध्ये पसरत चाललेल्या दहशतवादाला यामुळे रोखण्यास मदत झाली असे मत त्यांनी व्यक्त केले. सीरियामधील प्रश्नामध्ये सर्व वांशिक, राजकीय आणि धार्मिक गटांच्या समावेशानेच तोडगा काढता येईल असे मत रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी यावेळेस व्यक्त केले. (वृत्तसंस्था)

रशिया-सीरिया जवळीक
रशियामध्ये उत्पादन झालेल्या शस्त्रास्त्रांसाठी सीरिया हा जुना ग्राहक आहे. रशियाने स्वत: सीरिया प्रश्नात लक्ष घालून आयसील दहशतवादी संघटनेच्या विरोधात लढण्याचे कारण पुढे करत सीरियन बंडखोरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अल्वाईट पंथाच्या असाद यांना लेबनॉनमधील हेझबोल्ला, रशिया आणि इराण यांचा उघड पाठिंबा मिळाला आहे.

सीरियन युद्ध
सीरियात चाललेल्या यादवीमुळे २०११ पासून अडीच लाख लोकांनी प्राण गमावले आहेत. सुमारे एक कोटीपेक्षा अधिक लोकांना आपले घर सोडून परागंदा व्हावे लागले आहे. चाळीस लाखांहून अधिक लोकांनी देश सोडल्याची आकडेवारी उघड झाली आहे. तुर्कस्थान, ग्रीस, हंगेरी मार्गे सीरियन स्थलांतरित जर्मनी आणि पश्चिम युरोपच्या दिशेने जाण्यास बाहेर पडले. यामुळे युरोपातही अंतर्गत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Sudden Visit to Asad-Putin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.