सौदीच्या राजघराण्यात अचानक ‘वारसा’पालट
By admin | Published: April 29, 2015 11:40 PM2015-04-29T23:40:31+5:302015-04-29T23:40:31+5:30
सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी बुधवारी आश्चर्य वाटावे अशा रीतीने शाही पदव्यांची घोषणा केली.
बैरूत : सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी बुधवारी आश्चर्य वाटावे अशा रीतीने शाही पदव्यांची घोषणा केली. त्यांनी अनेक मंत्रीच नाही, तर आपल्या उत्तराधिकाऱ्यांचाही क्रम बदलत सत्तेच्या सारिपाटाची आपल्याला अनुकूल अशी मांडणी केली.
राजे सलमान यांनी मोकरेन बिन अब्दुल अजीज बिन सउद यांचे पद काढून घेत त्यांच्या जागेवर गृहमंत्री मोहंमद बिन नायेफ यांची नवे राजकुमार म्हणून नियुक्ती केली. मोकरेन यांना उपपंतप्रधानपदाच्या जबाबदारीतूनही मुक्त केले. याशिवाय सलमान यांनी त्यांचे पुत्र मोहंमद बिन सलमान यांना उपराजकुमारपदी नियुक्त केले. परराष्ट्रमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या राजकुमार सउद-अल-फैसल यांनाही पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले असून त्यांच्या जागी अदेल-अल-जुबैर यांची नवे परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती झाली. जुबैर हे राजघराण्याचे सदस्य नाहीत. मात्र, त्यांनी सौदीचे अमेरिकेतील राजदूत म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली आहे. या सर्व घडामोडींतून राजे सलमान त्यांचे पूर्वपदस्थ राजे अब्दुल्ला यांच्या धोरणांपासून आणखी दूर जात असल्याचे संकेत मिळतात.