Sudiksha Konanki Missing: भारतीय मूळ असलेली सुदीक्षा डोमिनिकनला झाली बेपत्ता; 'त्या' रात्री काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 20:46 IST2025-03-13T20:46:11+5:302025-03-13T20:46:58+5:30
तपासात सुदीक्षा कोनांकीला स्टाइल कव्हर अप बीचवर एक लाउंज खुर्चीवर अखेरचे पाहिले, परंतु तिच्यासोबत हिंसा घडली नसल्याचं दिसते.

Sudiksha Konanki Missing: भारतीय मूळ असलेली सुदीक्षा डोमिनिकनला झाली बेपत्ता; 'त्या' रात्री काय घडलं?
वॉशिंग्टन - डोमेनिकन रिपब्लिक इथं बेपत्ता झालेल्या भारतीय अमेरिकन विद्यार्थिनी सुदीक्षा कोनांकी प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. सुदीक्षा कोनांकी जेव्हा बेपत्ता झाली त्यावेळी बीचवर अन्य लोकही होते. कोनांकीचा शोध सातव्या दिवशीही सुरू आहे. पिट्सबर्ग विद्यापीठातील २० वर्षीय सुदीक्षा कोनांकी ६ मार्चला सकाळी पुंटा काना रिऊ रपब्लिका हॉटेलजवळील बीचवरून बेपत्ता झाली होती. त्यानंतर हवाई, समुद्रीमार्गे आणि ग्राऊंडवर तिचा शोध घेतला जात आहे. या शोध मोहिमेत अमेरिका, डोमिनिकन रिपल्बिक आणि भारताच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कोनांकी कुटुंब मूळचं भारतातील आहे.
वर्जीनियाच्या लाउडाऊन काउंटी इथं राहणारी सुदीक्षा कोनांकी विद्यापीठातील ५ मित्रांसोबत पुंटा काना इथं फिरायला गेली होती. लॉ एन्फोर्समेंट सोर्सनुसार, ६ मार्चला सकाळी महिला हॉटेल लॉबीमध्ये ड्रिंक करत होत्या. त्यावेळी पुरूषांसोबत सुदीक्षाला हॉटेलच्या बीचवर जाताना सीसीटीव्ही पाहण्यात आले. पहाटे ४.५५ च्या सुमारास ५ महिला आणि १ पुरूष बीचवर जात होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सकाळी ९ वाजता तोच संशयित पुरुष हॉटेलमधून जाताना दिसतो. परंतु सुदीक्षा दिसत नाही. तपासात सुदीक्षा कोनांकीला स्टाइल कव्हर अप बीचवर एक लाउंज खुर्चीवर अखेरचे पाहिले, परंतु तिच्यासोबत हिंसा घडली नसल्याचं दिसते.
'त्या' रात्री समुद्राची स्थिती भयंकर
डोमिनिकन रिपब्लिकन नौदलाचे जनरल कमांडर अगस्टिन मोरिलो रोड्रिगेज यांनी बुधवारी सांगितले की, ज्या रात्री सुदीक्षा कोनांकी गायब झाली त्या रात्री समुद्राची स्थिती धोकादायक होती. मोठमोठ्या लाटा उसळत होत्या. ज्या पुंटा काना बीचवर ४ पर्यटकांचा २ महिन्यापूर्वी बुडून मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी त्या बीचवर कोनांकीला शेवटचं पाहिले गेले. कोनांकीच्या बेपत्ता होण्याचं प्रकरण तपासात बुडून मृत्यू झाल्याच्या अँगलनेही सुरू आहे.
कोण आहे सुदीक्षा कोनांकी? (Sudiksha Konanki)
सुदीक्षा कोनांकी ही पिट्सबर्ग विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. पिट्सबर्गमध्ये प्री मेड अभ्यासासाठी ती स्प्रिंग ब्रेकसाठी पुंटा काना ट्रीपवर गेल्याचं तिचे वडील सुब्बारायुडु कोनांकी यांनी सांगितले. माझ्या मुलीला डॉक्टर बनायचं होते. ती पिट्सबर्ग विद्यापीठात केमिस्ट्री आणि बायोलॉजिकल सायन्सचं शिक्षण घेत होती. मूळचे भारतातील कोनांकी कुटुंब २००६ साली अमेरिकेत राहायला गेले. ते आता तिथले स्थानिक रहिवासी आहेत. ते वर्जीनियाच्या एशबर्न येथे राहतात.