हवाई तळावर आत्मघाती हल्ला
By admin | Published: September 19, 2015 01:57 AM2015-09-19T01:57:46+5:302015-09-19T01:57:46+5:30
तालिबान दहशतवाद्यांनी पाकिस्तान हवाई दलाचा येथील तळ आणि त्यातील मशिदीवर शुक्रवारी केलेल्या धाडसी हल्ल्यात २३ सैनिकांसह ४२ जण ठार झाले. मृतांपैकी
पेशावर : तालिबान दहशतवाद्यांनी पाकिस्तान हवाई दलाचा येथील तळ आणि त्यातील मशिदीवर शुक्रवारी केलेल्या धाडसी हल्ल्यात २३ सैनिकांसह ४२ जण ठार झाले. मृतांपैकी १३ दहशतवादी असून हल्ल्यादरम्यान उडालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा झाला. दहशतवादी लष्करी गणवेशात आले होते.
आत्मघाती जॅकेट, एके-४७ रायफल ग्रेनेड, उखळी तोफांनी सज्ज दहशतवाद्यांच्या एका गटाने प्रारंभी एका सुरक्षा चौकीवर हल्ला केला आणि त्यानंतर ते बडाबेर हवाई तळात घुसले. हा तळ पेशावरपासून सहा कि.मी.वर आहे. हवाई तळावरील हल्ल्यात ठार झालेल्या ४२ जणांत एका कॅप्टनचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाक हवाई दलाचे दोन कनिष्ठ तंत्रज्ञही ठार झाले. हल्ल्याच्या वेळी ते सुरक्षाकक्षात तैनात होते, अशी माहिती हवाई दलाच्या प्रवक्त्याने दिली. सुरक्षा दलांनी सर्वच्या सर्व १३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. तळातील मशिदीत लोक नमाज अदा करीत होते. दहशतवाद्यांनी त्यांना ठार केले, असे ते म्हणाले.
दहशतवादी लष्करी गणवेशात आले होते. दोन ठिकाणांहून तळात घुसल्यानंतर ते छोट्या छोट्या गटात विभागले. त्यांची सुरक्षा दलाशी तुफान चकमक उडाली. या हल्ल्यात आठ सैनिक आणि दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह २९ जण जखमी झाले, असेही बाजवा यांनी म्हटले आहे.
जखमींना पेशावर आणि लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेहरिक ए तालिबानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आमच्या आत्मघातकी पथकाने हा हल्ला घडवून आणला, असे तालिबानचा प्रवक्ता मोहंमद खुरसानी यांनी ई-मेलद्वारे सांगितले.
८० सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेरण्यात आले असून त्यातील ५० जणांना ठार करण्यात आले. महिला व बालकांना सुरक्षितरीत्या बाहेर जाऊ देण्यात आले, असा दावाही खुरसानी याने केला; मात्र त्या दाव्याला दुजोरा मिळाला नाही. (वृत्तसंस्था)