मक्कातील मशिदीत आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला
By Admin | Published: June 24, 2017 08:50 AM2017-06-24T08:50:15+5:302017-06-24T09:09:17+5:30
मक्कातील काबा येथील मशिदीला निशाणा करुन घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असणा-या एका दहशतवाद्याचा कट उधळून लावण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
रियाद, दि. 24 - मक्कातील काबा येथील मशिदीला निशाणा करुन घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असणा-या एका दहशतवाद्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयातील एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, येथील निवासी इमारतीत घुसलेल्या एका आत्मघातकी हल्लेखोराला सुरक्षा रक्षकांनी घेरले. मात्र यानंतर त्यानं लगेचच स्वतःलाच स्फोटाद्वारे उडवलं.
या घटनेत इमारत कोसळल्यानं पोलीस कर्मचा-यांसहीत 11 जण जखमी झाले आहेत. सोदी अरेबियाच्या गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर अन्य पाच संशयित दहशतवाद्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
रमजानच्या शेवटच्या दिवसात जगभरातील लाखो मुस्लिम मक्का येथे दाखल झाले आहेत. दरम्यान सौदी अरेबियातील अधिका-यांनी दहशतवाद्यांच्या या अयशस्वी हल्ल्याबाबत अन्य कोणताही तपशील जारी केलेला नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांत सौदी अरेबियामध्ये अनेक गंभीर स्वरुपाचे हल्ले झाले आहेत. ज्यातील काही हल्ले इसिसनं घडवून आणल्याचं बोलले जात आहे.
अधिकतर येथील शिया समुदाय आणि सुरक्षारक्षकांना टार्गेट करुन हल्ले केले जातात. जुलै 2016मध्ये मदीना येथे पैगंबर मोहम्मद यांच्या मशिदीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात चार सुरक्षा कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, शुक्रवारी पाकिस्तानमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तान सीमारेषेजवळ असणा-या कुर्रम जिल्ह्यातील परचिनार परिसरात हे स्फोट झाले. वर्दळीच्या ठिकाणी एका मार्केटमध्ये हे स्फोट घडवण्यात आले. या परिसरात आदिवासींची संख्या जास्त आहे.
पहिला स्फोट अकबर खान मार्केटमध्ये झाला. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईद आणि इफ्तारची शॉपिंग करण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असतानाच हा स्फोट झाला. पहिला स्फोट झाल्यानंतर उपस्थितांनी जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली असता दुसरा स्फोट झाला.