पाकमध्ये आत्मघाती हल्ला; १६ जण ठार
By admin | Published: February 14, 2017 04:14 AM2017-02-14T04:14:50+5:302017-02-14T04:14:50+5:30
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील विधानसभेबाहेर सोमवारी निदर्शनांदरम्यान एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिल्याने
लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील विधानसभेबाहेर सोमवारी निदर्शनांदरम्यान एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिल्याने पोलीस अधिकाऱ्यांसह १६ जण ठार झाले, तर ६०पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. विधानसभा इमारत व राज्यपालांचे निवासस्थान अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असून, सतर्कतेचे आदेश देण्यात आले असतानाच हा प्रकार घडला.
लाहोरचे वाहतूक पोलीस प्रमुख कॅप्टन (सेवानिवृत्त) मोबीन अहमद व लाहोरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जाहीद गोंडाल यांचा स्फोटात मृत्यू झाला. पोलिसांना लक्ष्य बनवून हा हल्ला करण्यात आला होता. औषध विक्रेत्यांच्या रॅलीमध्ये हा हल्ला करण्यात आला. मोबीन हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही क्षणांत हा हल्ला घडवून आणण्यात आला. टीव्ही फूटेजमध्ये एक मोटारसायकलस्वार वेगाने पोलीस अधिकाऱ्यांकडे येतो व स्वत:ला उडवून देतो, असे दिसत आहे. मोबीन यापूर्वी बलुचिस्तानमध्ये जीवघेण्या हल्ल्यातून बचावले होते. (वृत्तसंस्था)